पुणे: उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या स्थितीमुळे राज्यातील कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार तर मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पुढील तीन ते चार दिवस पडणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली असून, त्याचा प्रभाव कायम आहे. त्यानंतर गेल्या चोवीस तासात उत्तर महाराष्ट्रापासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या दोन्हीच्या प्रभावामुळे कोकणच्या किनारपट्टीसह मध्यमहाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर चांगलाच राहणार आहे. विशेषत: मध्यमहाराष्ट्र, उत्तर मध्यमहाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार ते मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर इतर भागापेक्षा जास्त असेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, गेल्या चोवीस तासात गुहागर-150, रत्नागिरी-100, मुंबई-100, विटा-110, अंबड -100, केज, आष्टी ( प्रत्येकी) -60, नांदगाव, काजी -50, वरोरा, मनोरा, देऊळगाव राजा, लाखंदूर, (प्रत्येकी)- 40 मिमी असा पाऊस झाला आहे.