पुणे: सिगारेट, तंबाखू, अल्कोहोल, ड्रग्ज व अन्य मादक पदार्थांच्या व्यसनांमुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे निवासी पद्धतीने होणारे ‘प्राण’ शिबीर आता ऑनलाईनही आयोजित केले जाणार आहे. पाच दिवसीय शिबिरात घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या सोयीच्या वेळेत सहभागी होता येऊ शकते. या संदर्भात माहिती देणारे एक तासाचे विनामूल्य प्रास्ताविक प्राण सत्र 3, 4 आणि 5 जुलै या कालावधीत सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होईल. याचा लाभ संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या (महाराष्ट्र) पीआर हेड कुमकुम नरेन यांनी केले आहे.
भारतात अंदाजे १ कोटी २० लाख लोक धूम्रपान करणारे आहेत. अल्पवयीन मुले व तरुणाईही गांजा, चरस, ई सिगारेट व अन्य मादक पदार्थाच्या नशेच्या विळख्यात अडकत चाललेले आहेत. नशेच्या काळात गुन्हेगारीच्या घटना घडतात. कमी वयात मुलांकडून असे प्रकार घडतात. नशेमुळे शरीरावरही दुष्परिणाम होतात. शिवाय भावनिक आणि सामाजिक स्तरावर अपरिमित नुकसान होते ते वेगळेच. औट घटकेची नशा एका व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंबाला अडचणीत आणते.
व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्याचा ‘प्राण’ कार्यक्रम अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’कडून अनेक वर्षांपासून सुरू आहे. या अंतर्गत मार्गदर्शन, समुपदेशन केलं जातं. संपूर्ण कुटुंबाला उभारी दिली जाते. उर्जा, जागरूकता, आत्मविश्वास वाढल्याने व्यसनांपासून दूर राहण्याची इच्छा व्यसनी व्यक्तीमध्ये निर्माण होण्यास मदत होते.
याबाबत कुमकुम नरेन यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यामुळे निवासी ऐवजी ऑनलाईन प्राण शिबीर आयोजित केले आहे. हे शिबिर सिगारेट, गुटखा, तंबाखू, अल्कोहोल, ड्रग्स, किंवा इतर पदार्थांच्या व्यसनांमुळे त्रस्त व्यक्तींना व्यसनमुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
मार्गदर्शन आणि पाठबळ: ‘प्राण’ ऑनलाइन हा पाच दिवसांचा कार्यक्रम आहे, दररोज चार तास, सकाळ आणि संध्याकाळच्या सोयीच्या वेळेत हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे सहभागी व्यक्ती त्यांच्या घरातून यात सहज सहभागी होऊ शकतील. सहभागी सदस्यांच्या कुटुंबालाही या प्रक्रियेचा एक भाग बनविण्यात येते. सदस्याला त्याच्या संपूर्ण जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यानंतर ‘प्राण’ची प्रशिक्षित टीम पुढील पाच आठवडे सहभागींशी जवळून संपर्कात असते. त्यांना मार्गदर्शन व पूर्ण पाठबळ दिले जाते.
इथे साधा संपर्क: दि 3, 4 व 5 जुलै या काळात सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होणाऱ्या एक तासाच्या मोफत प्रास्तविक प्राण सेशनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी स्वयंसेवकाशी 9423205228 किंवा 8600101138 वर संपर्क साधावा किंवा tiny.cc/Pranintro या लिंकवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
राष्ट्रीय हेल्पलाईन: व्यसनांशी संबंधित सर्व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने राष्ट्रीय हेल्पलाइन उपलब्ध केली आहे. 24 तासांची ही सेवा 08067612325 ह्या नंबरवर दूरध्वनी करून मिळू शकेल.