पुणे: उत्तर मध्य महाराष्ट्रापासून ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या स्थितीमुळे शुक्रवार, 3 व शनिवार, 4 जुलैपर्यंत मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे (घाटमाथा) कोकणात पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, उत्तर मध्यमहाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर या भागात मुसळधार तर मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद भागात मध्यम तर उर्वरित भागात हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्र, गुजरात आणि मध्यप्रदेश, विदर्भ, छत्तीसगड भागात गेल्या काही दिवसांपासून चक्रीय स्थिती असून, त्याचा प्रभाव कायम आहे. या स्थितीमुळे 3 आणि 4 जुलै असे सलग दोन दिवस चांगला पाऊस होणार आहे. गेल्या चोवीस तासात राज्यातील प्रमुख शहरांचा पाऊस मिमी मध्ये पुढील प्रमाणे: रामेश्वर कृषी-70, देवगड, मालवण-60, राजापूर, सांवतवाडी-50, शिरूर -120, महाबळेश्वर- 40, जेजुरी-30, परभणी-110, पूर्णा-80, धर्माबाद-70, उमरी-60, नांदगाव काजी-90, दर्यापूर-60, नागपूर- 50.