मुंबई: गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील हॉटेल्स व लॉज बुधवार, 8 जुलैपासून सुरू होणार आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर ही शहरे व महापालिका असलेल्या शहरातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या हॉटेल्सना या आदेशान्वये परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉटेल्स, लॉज हे त्यांच्या क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांनाच वापरता येणार आहेत. ग्राहकांचे थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक असेल, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल. मात्र, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसमधील गेमिंग झोन, स्विमिंग पूल आणि जिम बंद राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रविवारी हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसला सशर्त परवानगी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार काही अटी शर्थींसह हॉटेल्स व लॉजेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत हा निरोगी असला पाहिजे याची खात्री करण्यासाठी त्याची तपासणी करणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.