पुणे: कोकण वगळता राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या राज्यात पाऊस पडण्यासाठी अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील काही दिवस कोरडेच जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
कोकणातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई आणि ठाणे या भागात पुढील तीन दिवस काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, उर्वरित राज्यातील पावसाचा जोर सरासरीपेक्षा कमी झाला आहे. मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, घाट माथ्यावरील पाऊसही पूर्णपणे ओसरला आहे.
गेल्या चोवीस तासात राज्यातील पाऊस (मिमीमध्ये): बेलापूर-210, ठाणे-160, कल्याण-130, मुंबई, पालघर, उल्हासनगर-120, अंबरनाथ, वाडा-120, भिंवडी, माथेरान, तलासरी-90, वेल्हे-80, राधानगरी- 70, भंडारा-100, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा-80, आरमोडी, चंद्रपूर, चिमूर, साकोली-70, कोयना- 120, ताम्हीणी, शिरगाव-90, दावडी-70, अंबोणे, लोणावळा-60.