औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 253 जणांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 3824 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 145 तर ग्रामीण भागातील 108 जणांचा समावेश आहे. आज एकूण 194 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7134 एवढी झाली आहे. आजपर्यंत 327 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 2983 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात वाढलेल्या 194 रुग्णांपैकी औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 139 तर ग्रामीण भागातील 55 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
घाटीत चार, खासगीत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सहा जुलै रोजी औरंगाबाद शहरातील शरिफ कॉलनीतील चार वर्षीय मुलगा, वाळूजमधील 47 वर्षीय स्त्री, चेतना नगरातील 53 वर्षीय पुरूष, वैजापुरातील इंदिरा नगरातील 55 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 255 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 247 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते.
शहरातील एका खासगी रुग्णालयात 6 जुलै रोजी सावरकर कॉलनीतील 56 वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात 7 जुलै रोजी एन आठ सिडकोतील 78 वर्षीय पुरूष, शिवशंकर कॉलनीतील 47 वर्षीय पुरूष, दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात फाजलपुऱ्यातील 45 वर्षीय पुरूष आणि तानाजी चौक, शिवशंकर कॉलनीतील 63 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 247, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 78, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 327 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.