पुणे: गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकणाच्या काही भागात मुसळधार तर उर्वरित ठिकणी मध्यम स्वरूपाचा पडत असलेला पाऊस कमी झाला आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भात हलका पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पूर्व मध्य अरबी समुद्र कर्नाटक किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मात्र, या पट्ट्याची तीव्रता थोडी कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाटासह हलका पाऊस पडेल.
गेल्या 24 तासात राज्याच्या काही भागात पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे: मालवण-150, कणकवली-140, देवगड-110, राजापूर-90, मंडनगड-80, महाबळेश्वर-110, गगनवावडा-90, इगतपुरी, वेल्हे प्रत्येकी-70, जामनेर-60, पारनेर-50, मुखेड-70, उस्मानाबाद, परभणी प्रत्येकी-40, बुलढाणा-80, कारंजा, मूर्तिजापूर प्रत्येकी-50, ताम्हिणी-110, अबोणे-90, डुंगरवाडी-80.