कानपूर: कुख्यात गुंड विकास दुबेची भीती अखेर खरी ठरली. आज सकाळी कानपूर पोलीसांनी त्याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. उज्जैनमधून कानपूरला नेत असताना आज सकाळी पोलीस गाडीला अपघात झाला. त्यानंतर पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पळून जाणाऱ्या दुबेचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली.
विकास दुबेला गुरुवारी उज्जैनमध्ये
प्रसिद्ध महाकाल मंदिर परिसरात अटक करण्यात आली होती. त्याला आज कानपूर न्यायालयात हजर करण्यात येणार होते. दरम्यान, आज सकाळी दुबेला कानपूरकडे नेत असताना पोलीस गाडीला अपघात झाला. त्यावेळी दुबे याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांवर गोळीबार केला. पोलीस आणि दुबेमध्ये झालेल्या चकमकीत दुबेच्या छातीला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
उत्तरप्रदेश पोलीस 2 जुलै रोजी दुबेला अटक करण्यासाठी गेले असता दुबेच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस शहीद झाले होते. त्यानंतर दुबे फरार होता. त्याच्यावर 5 लाखांचे इनाम ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्याला उज्जैनमध्ये पोलीसांनी ताब्यात घेतले होते.