मुंबई: “१४० किंवा ४० या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते”, हा व्हायरल झालेला तो व्हिडिओ सोनी लाईव्ह या वाहिनेने आपल्या नवीन येणाऱ्या एका सिरीयलचे प्रमोशन करण्यासाठी तयार केल्याचे कळते. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मुंबई पोलिसांचा नाही, अशी महिती समोर येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली असून कुठलाही फोन आला तरी बँक डिटेल्स शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बँक अकाउंट, क्रेडिट, डेबिट कार्डची कोणतीही माहिती देऊ नका.140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत. त्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसून जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड चे पूर्ण नंबर तसेच सी. व्ही. व्ही./ पिन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलने केले आहे.
जर आपणास 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नये/ पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिले गेलेले असतात. परंतु हे देखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट/ क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर/ ओटीपी देऊ नये अथवा दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर, मुंबई, यांच्यावतीने करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांचा व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडीओने मुंबईकरांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस नागरिकांना सायबर गुन्हेगाराबाबत जनजागृती करीत “१४० किंवा ४० या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते”, असे या व्हिडिओमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल मेगा माईक वरून घोषणा करताना दिसतो. हा व्हिडिओ आणि त्याच सोबत व्हायरल झालेल्या मेसेजने मुंबईसह उपनगरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. मात्र, हा व्हिडिओ आणि मॅसेजमुळे लोकं पॅनिक झाल्यामुळे अखेर याची गंभीर दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतल्याने वरील आवाहन करण्यात आले आहे.
सायबर विभाग देणार मुंबई पोलिसांना अहवाल: समाजमाध्यमांवर शुक्रवारी व्हायरल झालेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये पोलीस वाहनातून फिरताना दिसत असून पोलीस उद्घोषणा करीत आहेत. १४० आकड्यापासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरचे आलेले फोन उचलल्यास बँकेतील सर्व रक्कम काढली जाईल, असे या उद्घोषणेत सांगितले जात आहे. एका खासगी टीव्ही वाहिनीने आपल्या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी केलेले हे चित्रीकरण आहे. मात्र तसा कोणताच खुलासा यामध्ये नसल्याने खरेखुरे पोलीसच या सूचना करीत असल्याचे नागरिकांना वाटले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी एकमेकांना समाजमाध्यमांवरून ही ध्वनीचित्रफित पाठवली. मात्र, मुंबई पोलीस दलाने ही अफवा असल्याचे काही वेळातच ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. राज्याच्या सायबर विभागानेही तातडीने वाहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार लागलीच थांबवण्याची सूचना दिली. या प्रसंगाबाबत सायबर विभाग आपला अहवाल मुंबई पोलिसांना देणार आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून वाहिनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.