परवा विकास दुबे पकडले गेले, मारले गेले….! आदरार्थी उल्लेख खटकतो ला? पण तो खटकण्याचे काहीही कारण नाही. तो खटकतो पण कधी? पकडला गेल्यावर, मारला गेल्यावर! त्याआधी अशा व्यक्ती आदरार्थीच संबोधलेल्या असतात, तशाच स्वीकारल्या गेलेल्या असतात -जिथे जिथे त्या ‘पोहचल्या’ असतात तिथे! त्यामुळे पकडल्या जाण्याआधी, मारल्या जाण्याआधीचा काही तासांच्या आधीचा मी उल्लेख केला आहे, त्यामुळे तो निषिद्ध ठरू नये!
निषिद्ध काय व्हावे? तर ते व्हावेत त्याच्या परिसरातील लोक म्हणजे आपण! आता ‘हे काय नवीन’, वाटेल!
तर हो, लोकांची म्हणजे आपली मुख्य जबाबदारी असते. गुन्हेगारीचा आणि गुन्हेगाराचा ‘विकास’ होतो, तो आम्हा लोकांमुळे!
ज्या दिवशी पहिला गुन्हा केला जातो, तेव्हा पोलिसांच्या आधी गुन्हेगार त्याच्या आजूबाजूच्या लोकांना गृहीत धरतो. मुळात त्याचे साथीदारही लोकांतूनच येतात आणि पुढे त्यातले ‘भाई का आदमी’,’साब का राईट हँड’,’बाबाचा माणूस’, नानाचा माणूस,’भाऊचा खास’, इत्यादी उपाधी लोकांतूनच मिळवतात.
आपण खूप लवकर पोलीस, यंत्रणा, राजकारणी यांच्यावर येतो. ह्या यंत्रणा आणि नेमणुका आम्हा लोकांतूनच उभे राहतात ना? थेट हत्यारबंद गुन्हेगाराचा धाक वाटून एखाद्याने साक्ष न देणे, तक्रार न देणे एकवेळ समजू शकते, पण ह्या यंत्रणांवर इतर लोकांचा दबाव नसण्याचे कारणच काय? फोन करून ‘अपना आदमी है’ हे सांगणाऱ्यांनीही लोकांनाच गृहीत धरले असते. त्यामुळे ‘तसे’ फोन जात असतात. असे फोन व अशा शिफारशी कर्तव्यबुद्धीच्या मुसक्या आवळतात. म्हणूनच ‘पुढच्या’ परिणामाची धमकी देऊन किंवा न देताही ‘तो’ सुटतो व पुढचा तपास खिळखिळा होतो.
…मग ज्याच्यासाठी फोन केला गेला आहे, ‘त्या’चा आत्मविश्वास शतपटीने वाढतो… त्यामुळे आधी तो मारायला तयार झालेला आता तो- चिरायला सिद्ध होतो….मग गोळ्या झाडायला, पुढे स्फोट करायला! वेळ-काळ, सरकारी ठिकाण, समोरच्याचे पद, कायदा(?), बंधने कशाकशाचाही तो मुलाहिजा बाळगत नाही! झालीच एखादी अटक-बिटक तर पुन्हा ‘साक्षी अभावी सुटला’ असे त्याचेच नाव दुमदुमत राहते. इथेही ‘एक जण आला नाही साक्ष द्यायला’,’एकाची टाप नाही झाली,…तिथंच केस फिरली…अहो, आमच्या डोळ्यासमोर झालतं’ अशा गोष्टी पंचक्रोशीत घर करून राहतात- मग होर्डिंग्ज वरून, कट्ट्यावरच्या गप्पांमार्गे ‘तो’ घराघरात शिरतो. मोठ्ठया माणसांत उठू बसू लागतो, त्यांचे स्वागत करतांना दिसतो, त्यांच्या आजूबाजूला दिसतो..!वावरताना गाड्या व फॅन्सी नंबर, सोनसाखळ्या, जे दृष्टीस पडल्यावर दडपून टाकू शकते, ते सर्व येते.
आम्हा लोकांना प्रसिद्धी खूप आवडते, मग ती कशीही असो. या आमच्या आवडीमुळे दहशत आणि प्रसिद्धी एकमेकींच्या हातात हात घालून ‘त्या’ला प्रस्थापित करतात. पुन्हा इथे- आपण लोकच चर्चा करून किंवा टाळून व वचकून राहून त्याचे पोषण करतो.’त्या’ला फक्त ए’खादी’ वारी करावी लागते. पॅरोलवर सुटलेला ‘तो’ त्या सुटीच्या काळात पुन्हा तसाच गुन्हा करण्याचीही उदाहरणे आहेत. याचे कारण ‘त्या’ला नसलेली आम्हा लोकांची भीती. अमुक एकाला मारले, फसवले, लुटले तर ‘लोक आपलीच पालखी काढतील’ ही जरब नसली की टिनपाट गुन्हेगाराचा ‘विकास दुबे’ झालाच म्हणून समजा! त्याला लोकांची भीती का वाटत नसावी? ‘त्या’ ची संख्या एकंदरीत लोकसंख्येच्या मनाने तर मूठभर असते, मग लोकांना त्याने भिण्याऐवजी लोकच त्याला भिऊन का असतात? याची अनेक कारणे आहेत. कधी त्याचे लोकांतून आलेले साथीदार आपल्याला एकटे दुकटे गाठून संपवण्याची भीती असते, कुणाला कुठलीतरी फाईल कुठल्यातरी सरकारी ऑफिसमध्ये अडण्याची भीती असते, कुठले तरी बांधकाम अडण्या- पाडण्याची भीती असते, कुठली भानगड उघडी पडण्याची भीती असते, कुणीतरी नातेवाईक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यावर बिल कमी करण्यासाठी अमक्याला विनंती केलेली असते, कुणाला आपल्याला पाल्याला प्रतिष्ठित शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश हवा असतो….ही सगळी आपलेच दुखणी- त्यावर ‘त्या’ची फुंकर हवी असते, त्याची उपचारपद्धती हवी असते. त्यामुळे यंत्रणावर आपला दबाव येत नसतो. काही अपवादात्मक व समजून घेता येतील अशा बाबी सोडल्या तर बहुत करून कुठलीतरी संधी साधणे किंवा साधलेली लपवणे, ही खाद्ये आपणच यंत्रणांना पुरवलेली असतात,
म्हणून आपल्यात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे धैर्य नसते. तेव्हा भीतीच्या मुळाशी ही खते असतात.
आणखी एक आश्चर्यांची बाब. पकडला किंवा मारला गेल्यानंतरच एखादा गुंड, बाबा, बुआ यांच्या स्थावर मालमत्ता, सोने-नाणे,
बँकेतील खाती, साथीदार, नातेवाईक, त्याने केलेले गुन्हे, त्याचे परदेश दौरे, तिथल्या गुंतवणुकी व इतर प्रकरणे ह्याची इत्यंभूत माहिती कशी होते? त्याचे समर्थक किती, त्याचे बंगले, वाडे, फार्म हाऊस, किती, त्याच्या गुहा किती, त्यात पंखे किती, त्यात एसी किती, पोहायचे तलाव किती, कुठून कसे कुणी आलेले-गेलेले कसे दिसायचे, त्याची जनतेला गंडवण्याची व वेठीस धरण्याची कार्यपध्दती कशी असायची, हे बारीक तपशील इलेक्ट्रॉनिक माध्यमे कसे मिळवितात? यातले आधी काहीच माहीत होत नाही का? गुन्हेगाराकडून, बाबा, बुआ यांच्याकडून एखादा तात्कालिक गुन्हा घडला नाही, किंवा त्याची वाच्यता झाली नाही तर ह्या संपत्तीने भरलेल्या गुहा आणि त्याचे कर्तृत्व ह्या कुठल्या सरकारी कागदावर न येता ‘गुहे’तच राहिल्या असत्या का, असे आ वासून ‘त्या’च्याबद्दल ऐकताना वाचताना वाटते. ‘त्या’चे चालू असलेले गुन्हे बाहेर काढण्यासाठी एखादी पीडित स्त्री किंवा पीडित पुरुष समोर आल्यावरच सगळी माध्यमे कसे बाहेर पडतात, असा प्रश्न पडतो.
दुसऱ्या शब्दात मांडायचे तर, ज्याअर्थी लोकांतील एकाने तक्रार केल्यावर मिडियाचे कॅमेरे इथे-तिथे फिरतात, त्याअर्थी या तात्कालिक व डोळ्यावर आलेल्या गुन्ह्याआधी लोकांतील अनेकांनी त्याला मोठे केले असते…!
सध्याच्या प्रकरणातील विकास दुबेवर हत्या, हत्येचा प्रयत्न इत्यादी छोटे मोठे असे 60 गुन्हे होते. त्यातला एक गुन्हा म्हणजे- ‘भाजपच्या एका राज्यमंत्र्याची हत्या’ हा ठळकपणे बातम्यात ऐकायला, वाचायला मिळाला. ह्यात म्हणे, साक्षीदार मिळाला नाही व तो सुटला. पुन्हा इथे लोकांची व ज्यांच्या समक्ष हा गुन्हा घडला त्यांची जबाबदारी येत नाही का? किंवा त्याचवेळी याचे एन्काऊंटर का केले नाही? त्यावेळी अधिकार नव्हते?की धैर्य नव्हते? किमान एकाचीही साक्ष का मिळाली नाही? मग प्रश्न पडतो, हा गुन्हा कळाला, तेव्हा सगळेच विकास दुबेच्या गळाला लागलेले होते का? ‘साक्ष मिळाली नाही’ या स्वरूपात तरी सरकारी नोंद होती ना? मग पुढेही 20 वर्षे हा गुन्हे कसा करत होता ? ‘साक्ष न देणे’ हा एकट्या दुकट्याचा प्रश्न नसतो तर लोक सामूहिकरित्या घाबरतात, हे जास्त दुःखदायक आहे. हा राज्यमंत्र्याच्या हत्येचा गुन्हा घडून 20 वर्षे झाली तरी पुढच्या कुठल्याच गुन्ह्यात विकास दुबे सापडत नाही, ही सामूहिक उदासीनता, ही खरी मेख आहे. 20 वर्षानंतर आठ-नऊ पोलिसांच्या हत्येनंतर त्याच्यावरचे साठ किंवा सतराशे साठ गुन्हे मोजणे व त्या गुन्ह्यांचे तपशील काय करायचे? कायद्याची भीती, यंत्रणेचा धाक कुणाला, तर तो कायद्याला घाबरणाऱ्यांना! ज्यांची गुन्हेगारी क्षमता( criminal ability) असते त्यांना काही नाही! ‘त्याला त्याचा बाप भेटेल’,’या लोकांचा अंत असाच होतो’ , ‘तो भोगेल शेवटी’,’सापडेल एकदा कुठल्या तरी लफड्यात’, ही सारी वाक्ये म्हणजे सोयीस्कर समजूत! ती समजूत नाईलाजाने व्यवहार्य ठरते, कारण एका भोगणाऱ्याचे दु:ख, मनस्ताप, नुकसान, फसवणूक,
मानहानी ही फक्त एखाद्या व्यक्तीची किंवा त्याच्या कुटुंबाची असते…त्याचे इतर कुणालाही काहीही नसते , ही दुसरी मेख! पण ‘तो’ एकदा ‘सुटला’ की त्याचा गुन्हा करण्याचा आत्मविश्वास व उपद्रव क्षमता वाढून तो अधिक मोठा गुन्हा करतो, त्याचे काय?
तेव्हा आम्हा लोकांचा गुन्हेगारापेक्षा त्यांना प्रतिबंध घालणाऱ्या यंत्रणावरही तेवढाच वचक हवा, अन्यथा…पोलिसांच्या हत्या झाल्याप्रमाणे एखादा गुन्हेगार यंत्रणांच्या गळ्याला येईपर्यंत गुन्हेगारी रोखली नाही तर राखली जाते आणि…तिचा ‘विकास’ होतच राहतो…
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
लेखक उद्योजक आहेत
मो 9767202265
surendrakul@rediffmail.com