पुणे: गेल्या काही दिवसांपासून थांबलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे. 15 ते 18 जुलैदरम्यान मध्यमहाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, विदर्भ तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पाऊस थांबला होता. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली होती. दक्षिण महाराष्ट्रापासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मात्र, त्याचा प्रभाव कमी झाला होता. आता या पट्ट्याचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. 15 ते 18 जुलैदरम्यान राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात काही ठिकाणी अतिववृष्टी, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. विशेषत: कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे घाटमाथ्यावर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.