# उद्योग, आस्थापनांनी कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पास पुण्यासह पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात येण्या जाण्यास पात्र.

 

पुणे:  उद्योग, आस्थापनांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पासेस पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रात येण्या-जाण्यास पात्र राहतील, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कळविले आहे. पुणे जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर झाली असून या कालावधीत उद्योग, आस्थापना, कंपन्यांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पास पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात प्रवासासाठी लागू रहातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि कृषी कंपन्या कडक टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) काळातदेखील सुरू राहणार आहेत. या कंपन्यांमधील अधिकारी, कामगार यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस पासची गरज नसेल, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कळविले आहे.

कंपन्यांच्या एचआर (मनुष्यबळ) विभागप्रमुखाने कंपनीच्या लेटरहेडवर वाहन परवाना द्यावा. या परवान्यांची माहिती एचआरने संबंधित पोलीस आयुक्त व पोलीस स्टेशन प्रभारी यांना द्यावी. कामगार-अधिकाऱ्यांनी कंपनीने दिलेला वाहन परवाना सोबत ठेवणे बंधनकारक आहे. मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व्यावसायिक, आणि रुग्णवाहिकांना शहरांतर्गत वाहतुकीसाठी वेगळ्या पासची अथवा परवानगीची गरज नाही. तसेच पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी ९ ते ६ वेळेत शासकीय, अत्यावश्यक सेवेतील तसेच कंपन्यांनी परवानगी दिलेल्या वाहनांसाठी सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झालेल्या एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. परंतु जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कन्टेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, जेजुरी, कुरकुंभसह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्र सुरु राहतील, ग्रामीण भागातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या सर्व ग्रामपंचायती, तालुक्याच्या ठिकाणची शेती संबंधित खते, औषधे व अवजारांच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.  ग्रामीण भागात नागरिकांनी कामाशिवाय बाहेर फिरु नये, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *