जालना: कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जालना शहरामध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींशी झालेल्या विचारविनिमियानुसार 20 जुलै, 2020 रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. बिनवडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, तहसीलदार भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जालन्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला असून, ही अतिशय चिंतेची बाब आहे. यावर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेतील व महसूल विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. कोरोनाची साखळी तुटून वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी सांगितले.