# कोरोना काळातील भारतीय कृषीव्यवस्था.. -डाॅ. संतोष तावरे.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर शेती आणि शेतीशी निगडीत उद्योग यावर अवलंबून आहे. शेती म्हणजेच कृषी आणि कृषी उद्योग. आपण सर्वजण मागील काही महिन्यांपासून जगावर आलेल्या कोविड-१९ या विषाणूच्या शंकांनी ग्रासलेले आहोत. जगभर पसरलेल्या या महामारीने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली आहे. आपला भारत देश सुद्धा या महामारीच्या विळख्यात अडकला आहे आणि आपल्या देशावर आणि राज्यावर सुद्धा या महामारीमुळे आर्थिक संकट कोसळले आहे.

देश आणि राज्य दोघेही अशा आर्थिक संकटातून जाताना शासनाने किंवा सरकारने तत्पर निर्देश काढून कृषी किंवा कृषीशी निगडीत व्यवसाय खुले केले. या तत्पर निर्णयामागे खूप मोठा इतिहास दडलेला होता. कृषी आणि कृषीशी निगडीत सर्व कृषी व्यवसाय हे इतिहास काळापासूनच देशाची आणि राज्याची आर्थिक संजीवनी (फायनान्शियल लाईफ लाईन) म्हणून ओळखले जातात. याचीच पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाली. यापेक्षाही पुढे सांगायचे झाले तर आपल्याला जीवन जगण्यासाठी ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या सर्व शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय यांच्यावरच निर्भर आहेत. संकटकाळी आपण महामारीसारखे संकट समोर भेडसावत असताना जीवनावश्यक किंवा अत्यावश्यक गोष्टी घेऊन येण्यासाठी बाहेर पडलो. त्या अत्यावश्यक जीवनोपयोगी वस्तूंनी आपले जीवन तर वाचवलेच पण अशा या आर्थिक मंदीच्या काळात राज्य आणि देश यांना लागणारी आर्थिक संजीवनीसुद्धा दिली. महामारीच्या भीषण संकटाच्या वेळी बळीराजा शेतकरी आणि शेतीसाठी लागणारे सर्व पूरक व्यावसायिक यांनी हिरीरिने पुढाकार घेत सामोरे आले आणि कुठल्याही गोष्टीची पर्वा ना करता राज्य आणि देश यांना आर्थिक संकटातून काहीशा प्रमाणात वाचवले.

आपण ज्या उद्योगास कमी लेखतो किंवा उद्योग धंद्यामध्ये शेवटचे स्थान देतो त्या उद्योगाची गरज आणि ताकद आपल्याला कधीच कळली नाही. शेतीप्रधान देश आणि शेतीप्रधान राज्य किती मोठे असू शकते आणि याचा फायदा अशा आपत्तीच्यावेळी कशा प्रकारे होतो, हे आपण सर्वांनी जवळून पहिले. भारतात १९७० च्या दशकात हरित क्रांती झाली आणि या हरित क्रांती नंतर देशात कृषी क्षेत्रात होणारा बदल पाहिलेले अनेक ज्येष्ठ राजकारणी, समाज सेवक आणि राज्यकर्ते याला साक्षीदार आहेत. आपल्या कृषीप्रधान देशाने जनतेला आणि जगाला पुन्हा एकदा कृषी आणि कृषी उद्योगाची ताकद आणि गरज पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
डॉ. संतोष दादासाहेब तावरे, पुणे
लेखक कृषी शास्त्रज्ञ व कृषी मार्गदर्शक आहेत.
मोबाईल: 9860111333
ईमेल: dr.sdtaware@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *