# औरंगाबादेत व्यापाऱ्यांना कोविड टेस्टशिवाय दुकाने उघडता येणार नाहीत; महापालिकेचे आदेश.

-शनिवारी दुपारपासून तपासणीस प्रारंभ.
-पहिल्या टप्प्यात भाजीपाला, फळ, दूध, चिकन, मटण, अंडी विक्रेते, किराणा दुकानदार, सलून यांना बंधनकारक.
-दुसऱ्या टप्प्यात मेडिकल, कपडे, शोरूम, इलेक्ट्रॉनिक्स आदी सर्व व्यापाऱ्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक.

औरंगाबाद: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा आज महत्वपूर्ण निर्णय घेतला. भाजीपाला, फळ, दूध, चिकन- मटन आणि किराणा दुकानदाराने रविवारपूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल त्यालाच रविवारपासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार.

शनिवारी रात्री बारा वाजता नियोजित संचारबंदी संपुष्टात येणार आहे. रविवारी ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना टेस्ट केलेले निगेटिव्हचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येईल. शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, दूध विक्रेते, चिकन- मटन, किराणा दुकानदारांना पहिल्या टप्प्यात प्रमाणपत्र मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यापाऱ्याकडे प्रमाणपत्र नाही त्याने दुकान उघडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार आहे.

व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी तपासणी पथक:
जिल्हा व्यापारी महासंघ, भाजीपाला विक्रेत्यांच्या संघटना आणि इतर व्यापाऱ्यांशी समन्वय साधून महापालिकेने शनिवारपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल 15 मोबाईल टीम तपासणीसाठी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. निगेटिव्ह आलेल्या व्यापाऱ्याला जागेवरच कोविड-१९ निगेटिव्ह असे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 टीम तैनात राहतील. पहिल्या टप्प्यात ज्या व्यापाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यांनी तपासणी करून घ्यावी मगच दुकान उघडावे असे आवाहन पांडेय यांनी केले.

दुसऱ्या टप्प्यात सर्व व्यापाऱ्यांचा समावेश:
मेडिकल दुकानदार, इलेक्ट्रिक, शोरूम, पंक्चर दुकानदार यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांना २५ ते ३१ जुलैपर्यंत कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक राहणार आहे. शहरात व्यापक प्रमाणात तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत याचा जास्तीत जास्त लाभ नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घ्यावा, असेही प्रशासनाने नमूद केले.

मनपाच्या 400 कर्मचाऱ्यांची टीम:
सध्या संचारबंदीत पोलिसांसोबत प्रत्येक पॉइंटवर काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तपासणीसाठी नेमण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या टीम सोबत हे कर्मचारी मदतनीस म्हणून काम करतील. प्रमाणपत्र देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे.

औरंगाबादकरांचे आरोग्य त्यांच्याच हाती:
-शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.
-ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना टेस्ट केलेले प्रमाणपत्र नसेल त्यांच्याकडून कोणतेही सामान खरेदी करण्यात येऊ नये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *