औरंगाबाद: अण्णा भाऊंचे तत्त्वज्ञान हे त्यांच्या जगण्यातून आणि अनुभवातून आलेले आहे. सर्वसामान्य माणसांच्या संघर्षमय जगण्याला जीवनमूल्य प्राप्त करून देण्यासाठी अण्णाभाऊंनी साहित्य निर्मिती केली, असे प्रतिपादन लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. भगवान वाघमारे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे शनिवार, १८ जुलै रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान ऑनलाईन झाले. यामध्ये व्याख्याते डॉ. भगवान वाघमारे यांनी ‘सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या तत्त्वज्ञानाची कालसुसंगतता’ या विषयावर विचार मांडले. तर अधिसभा सदस्य प्रा. संजय गायकवाड यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या केंद्राचे संचालक डॉ. डी. एम. नेटके व डॉ. कैलास अंभुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. राजर्षि शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचे ऑनलाइन सादरीकरण झाले.
यावेळी डॉ. भगवान वाघमारे म्हणाले,
अण्णा भाऊंचे तत्त्वज्ञान हे सामान्य माणसांचे व सामान्य माणसासाठीचे तत्त्वज्ञान आहे. ते त्यांच्या जगण्यातून आणि अनुभवातून आलेले आहे. सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून मूल्य प्राप्त व्हावे, त्याला आत्मभान यावे, आत्मसन्मान प्राप्त व्हावा ही त्यांची तळमळ होती. त्यांच्या साहित्यामध्ये केवळ दलित व कामगार जीवनाचे चित्रण येत नाही तर शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्ग, स्त्रिया, उपेक्षित या सर्वांचे चित्रण येते, असेही ते म्हणाले.
अण्णा भाऊंना एका विशिष्ट वादात बंदिस्त करणे अयोग्य ठरते. कारण त्यांच्या तत्त्वज्ञानात महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, राजषी शाहू महाराज, मॅक्झिम गॉर्की, कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींच्या तत्त्वज्ञानाचा, विचारांचा समन्वय आहे. त्यामुळे ते व्यापक व वैश्विक पातळीवर जाते, असेही डॉ. वाघमारे म्हणाले.
आज जाती धर्मातील भावना टोकदार बनल्या असून अशावेळी अण्णा भाऊ साठे यांचे परिवर्तनवादी विचार माणसांना जोडून घेऊ शकतात, असे प्रा. संजय गायकवाड म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते म्हणाले, अण्णा भाऊंच्या साहित्यात सामाजिक सलोखा जोपासला गेला आहे. साहित्य संपदेसोबत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णा भाऊंचे योगदान अनेक पिढ्या स्मरणात राहील, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संचालक डॉ दिगंबर नेटके यांनी सांगितले. डॉ कैलास अंभोरे यांनी सूत्रसंचालन तर प्रतीक कुकडे याने आभार मानले.