पुणे: शहरात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर रविवार, 19 जुलै रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. श्रावण महिना सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी गटारी अमावस्या साजरी करता यावी त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामध्ये किराणा, भाजी, चिकन, मासे, अंडी ही दुकाने उघडी राहणार आहेत. मात्र, वाईन शाप 23 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. असे असले तरी ज्यांनी अगोदरच स्टाॅक करून ठेवलाय त्यांची चंगळ होणार आहे.
दरम्यान, सोमवारपासून प्रशासनाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेतच दुकाने सुरू असणार आहेत. पाच दिवसांच्या बंद नंतर रविवारी रस्त्यांवर गर्दी वाढू नये, म्हणून सायंकाळपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मागील मंगळवारपासून शहरात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. उद्या रविवारी लॉकडाऊन काही अंशी शिथील करण्यात येणार आहे. येत्या 23 जुलैपर्यंत शहरातील दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू असणार आहेत. त्याबातचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी काढला आहे.