# काळ्या आईच्या मायेची अनुभूती अन् आपल्या मुळांना भेट दिलेल्या ‘मोठ्यां’चा कृतज्ञता भाव…

कोरोनामुळे सगळ्या जगावर वाईट स्थिती ओढवली आहे, पण सगळ्याच गोष्टी नकारात्मक घडत आहेस असे अजिबात नाही. काही गोष्टी चांगल्याही घडत आहेत. सतत धावणारा माणूस थांबलाय. विचार करतोय. आपल्या मातीच्या ओढीने मूलभूत, हातातून सुटलेल्या गोष्टी पुन्हा घट्ट पकडतो आहे.. थोडक्यात माणूस आपल्या बेसिककडे, मूळाकडे परतत आहे आणि कमालीचा आनंदित होतो आहे..एकूण निसर्गाच्या साथीने मोकळा श्वास घेतो आहे.

कोरोनाच्या संकटाने लॉक झालेल्या काळात आपापल्या क्षेत्रात व्यस्त दिग्गजांना मोकळा वेळ मिळाला, आपल्या मुळाशी परतत तो त्यांनी साजराही केला, हा आनंद काही न्याराच असल्याच्या भावनाही उस्फूर्तपणे बोलून दाखवल्या, त्यामध्ये सलमान खान, रणदिप हुडा सारखे कलाकार आहेत, पूनम मलिकसारखी हॉकीपटू आहे, मनोज कुमार, अमित पांघलसारखे बॉक्सर, असे अनेक आणि राजकीय क्षितिजावर अलिकडे चमकणारे युवा नेते, माजी मंत्री डॉ.परिणय फुकेही…

पनवेलच्या फार्म हाऊसजवळ घेतलेल्या शेतीत सुपरस्टार सलमान खानने भात लावला, असं नाही की त्याने फक्त फोटो काढून सोशल मिडियावर टाकण्यासाठी नाटक केलं, तर खरोखर प्रत्यक्ष तो शेतातल्या मजुरांसोबत दिवसभर राबला आणि श्रम करणा-या शेतक-याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.. लॉकडाऊनच्या एकूण काळात तोच काय त्याचे सर्व कुटुंबीय, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीससह अनेक मित्र मैत्रिणी असे काम करताना दिसले.. याच काळात माधुरी दीक्षितपासून कतरीना कैफ, हुमा खानपर्यंत अनेक कलाकार मंडळी अशीच घरातली  बेसिक कामं करताना दिसली, महत्वाचे म्हणजे त्यात त्यांना वेगळा आनंद मिळाल्याच्या भावनाही त्यांनी बोलून दाखवल्या..शेतीचा विषय असेल आणि आपल्या मातीसोबत रमण्याच्या भावना असतील तर नाना पाटेकर, जयकांत शिखरे फेम प्रकाश राज, रणदिप हुडा, नवाजुद्दीन सिद्धिकी, तिकडे दक्षिणेत मामुटी, पवन कल्याण, माधवन आणि अनेकजण मनापासून मातीत हात मळवताना पण आत्मिक आनंद मिळवताना दिसले.. दिग्दर्शक मन्सूर खान आणि गायक लकी अलीसारखे तर सगळं सोडून आधीच पूर्णकाळ शेतकरी झालेले आहेत.

हा आनंद घेण्यात क्रीडा क्षेत्रही मागे नाही. क्रिकेटपटू या भावनेपलीकडे गेले असावेत. उल्लेख करावा असे कुणी क्रिकेटपटू शेती करताना किवा श्रमाचा आनंद घेताना दिसले नाहीत..!! पण इतर सर्व खेळातील क्रीडापटू आपल्या वडीलोपार्जीत शेतीत आनंद शोधताना दिसले, लॉकडाऊनमध्ये मजूर मिळाले नाहीत म्हणून हॉकीपटू पूनम मलिकने गहू काढला तर बॉक्सर मनोज कुमार आणि अमित पांघलने गहू काढण्यापासून मळून पिशव्या भरेपर्यंत शेतात काम केले..

राजकारणात बहुतेक राजकीय नेते हे शेतकरी असतात, छोट्या स्तरावर जे राजकारण करतात, ते शेतीही करतात, किमान ते आपला बांध पालथा घालतील, पण राजकारणात मोठे झालेले किवा मोठी उंची गाठलेले कागदावर शेतकरी राहतात. मात्र, त्यांचा शेतीचा संबंध केव्हाचाच सुटलेला असतो, रोजीसाठी, व्यवसाय म्हणून अनेकजण शहरात स्थलांतरीत होतात आणि शेतीचा, आपल्या मुळ गावाचा संपर्कही तुटून जातो. अशा असंख्य लोकांना, राजकीय व्यक्तींना कोरोनाने आपल्या गावी नेले आणि जुने दिवस पुन्हा जगण्याचा योग आला. राजकारणातील प्रतिनिधी म्हणून विदर्भातील युवा नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ परिणय फुके यांनाच पाहा. कोरोनामुळे सगळं जग थांबलं आणि नागपूरला स्थायिक झालेल्या आणि इतरवेळी सतत व्यस्त असलेल्या डॉक्टरांना जुनोना फुँके या आपल्या जन्मगावी जाता आले, पुन्हा जुन्या दिवसांच्या आठवणीना उजाळा मिळाला, शेतात त्यांनी दिवसभर काम केले. नांगरणी, वखरणी केली, शेतात वाढलेली जंगली झाडे कापली, गाईचे दूध काढले. संपूर्ण दिवस असा शेतात राबण्यात गेला आणि भावनिक होत तोंडून स्वाभाविक प्रतिक्रीया निघाली……..
“…आईचे आपल्यावर अनंत उपकार..! ज्या मातीत आपला जन्म झाला. त्या मातीची किंवा जन्मगावाची ओढ आपल्याला कधीच स्वस्थ बसू देत नाही. मुळातच भूमिपूत्र असल्याने त्या मातीशी आपले नाते फार वेगळे आणि भावनिक असते. त्यामुळे मनात वेगळे समाधान होते. ही आपली आई आहे आणि शेतक-यांचा धर्म या मातीच्या संगोपनाचा आहे. तिचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. ते कधीच आपल्याला फेडता येणार नाहीत. हातात ती मूठभर घेऊन आपल्या कपाळाला लावली तर तिच्याशी आपले असलेले नाते अधिक घट्ट होते. घरी परत येताना माझ्या मनात हेच समाधान होते…”

कोरोनामुळे जी स्थिती निर्माण झाली त्यामुळे जगाच्या असंख्य गोष्टी हिरावल्या गेल्या आहेत पण वैयक्तिक पातळीवर असंख्य लोकांना वेगळे, जुने आणि नवीन समधानाचे, सुखाचे क्षणही अनुभवता आले आहेत.
-साध्वी खटावकर, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *