औरंगाबाद: शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन, आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, अद्यापही संसर्गाची साखळी वाढतेच आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामावर आणि हालचालींवर निर्बंध घातले जात आहेत. त्याच अनुषंगाने आता गणेशोत्सव साजरा करण्यावरही निर्बंध घातले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करत काही सूचना व निर्बंधाचे आदेशही महापालिकेने सोमवारी (दि. २०) जारी केले आहेत.
प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी ११ जुलै रोजी परिपत्रक काढले होते. त्याच्या आधारावर पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी सार्वजनीक गणेश मंडळ आणि घरगुती गणेश मंडळावरील निर्बंधाचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसेच न्यायालयाच्या आदेश आणि धोरणानुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावे लागणार आहेत. त्याच पद्धतीने शहरातही त्याची अंमबलजावणी करण्यासाठी आयुक्तांनी सूचना व निर्बंधाचे आदेश शहरासाठी जारी केले आहेत. आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात बारा प्रमुख सूचना केल्या आहेत. त्यात प्रमुख सूचना ही यंदा सार्वजनिक गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. गणेश मंडळांना मंडपाशेजारीच कृत्रिम तयारी करून तेथेच विसर्जन करण्याची सूचना करण्यात आली आहे. पालिका प्रशासन, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करून तेथेच विसर्जन करावे. गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने, गर्दी होणार नाही, याची काळजी घेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या उपाययोजना करून साजरा करण्याचे आवाहन आयुक्त पांडेय यांनी शहरवासीयांना केले आहे.
-मूर्ती २ ते ४ फुटांपर्यंतच असावी
श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांच्या मर्यादेत असावी. पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन पुढील वर्षाच्या विसर्जन वेळी करावे, या सूचना केल्या आहेत.
-जनजागृतीपर उपक्रम राबवावे.
आरोग्य व सामाजिक विषयक संदेश जाहिराती प्रदर्शित कराव्यात. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक शिबिर उदा. रक्तदान, कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.
या आहेत मार्गदर्शक सूचना:
-महापालिकेची पूर्वपरवनागी घेणे बंधनकारक.
-सजावट ही साध्या पध्दतीने करणे.
-गर्दी आकर्षित होणार नाही, याची काळजी घेणे
– वर्गणी देणगी स्वेच्छेने दिल्यावरच घ्यावी.
-आरतीसह धार्मिक कार्यक्रमात गर्दी टाळावी.
-ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे.
– दर्शनसुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूकद्वारे करणे.
-विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमी वेळ थांबावे.
प्रतिबंधात्मक उपायांसाठी या सूचना आवश्यक:
-मंडपांमध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनिंगची व ऑक्झिमीटर तपासणीची व्यवस्था करावी.
-दर्शनास भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम, मास्क, सॅनिटायझरचे नियम पाळावे.
-श्रीच्या आगमन, विसर्जन मिरवणुका नको
-लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.