औरंगाबाद: महापालिकेने शहरातील व्यापाऱ्यांची कोरोना अँटिजेन चाचणी सुरू केली आहे. त्यासाठी व्यापारी रांगा लावून तपासणी करून घेत आहेत. शनिवारपासून (दि.१८) सर्व नऊ झोनमध्ये एकूण २७ ठिकाणी जम्बो अँटिजेन टेस्टिंग मोहीम सुरू आहे. सोमवारी ५१३२ व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात आली यामध्ये १०७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे तीन दिवसात एकूण २९१ व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महापालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील सर्व किराणा व्यापारी, दूध, अंडी, मटण, चिकन भाजीपाला-फळ विक्रेते, सलून चालक व कर्मचारी यांच्या पहिल्या टप्यात कोरोना अँटिजन टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील विविध २७ भागात जम्बो टेस्टिंग शिबिरे सुरू आहेत. तपासणीत शनिवारी ८५ तर रविवारी ९९ विक्रेते कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यात सोमवारी ५१३२ व्यापाऱ्यांची अँटिजन चाचणीद्वारे कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये १०७ विक्रेत्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तीन दिवसात १४ हजार १३२ विक्रेत्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.