अंबाजोगाई: अंबाजोगाई शहर व परिसरात सोमवारी झालेल्या पावसामुळे शहरासाठी राखीव असलेला काळवटी साठवण तलाव ओव्हर फ्लो झाला असून, त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर महिनाभरातच हा तलाव ओव्हर फ्लो होण्याची ही गेल्या कित्येक वर्षानंतर पहिलीच वेळ आहे. काळवटी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे अंबाजोगाईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
दरम्यान, यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे शहर व परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. त्यामुळे बुट्टेनाथ, नागनाथ, काळवटी तांडा हा परिसर सौंदर्याने नटला असून निसर्गप्रेमींना खुणावत आहे.
अंबाजोगाई शहराला मुख्यत्वे धनेगाव धरणातून पाणीपुरवठा होतो, तेथून पाणीपुरवठा थांबल्यास शहरासाठी राखीव असलेल्या काळवटी तांडा येथील साठवण तलावातून अंबाजोगाईकरांची तहान भागवली जाते. त्यामुळे काळवटी साठवण तलावाचे अंबाजोगाईकरांसाठी अनन्य साधारण महत्व आहे. या तलावाची साठवण क्षमता 1.41 दशलक्ष घनमीटर एवढी असली तरी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास अंबाजोगाईला या तलावाचे पाणी किमान सहा महिने पुरते. त्यामुळे हा साठवण तलाव पावसाळा सुरू झाल्यानंतर महिनाभरातच भरल्यामुळे अंबाजोगाईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अंबाजोगाई शहर व परिसरात सोमवारी रात्री झालेला पाऊस मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होता. अंबाजोगाईत या पावसाची 58 मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे. बर्दापूर 18, घाटनांदूर 49, लोखंडी सावरगाव 14 व पाटोदा येथे 15 मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे.