जालना: जालना शहरातील ख्यातनाम उर्दू आणि हिंदी शायर शमशुद्दीन मोहंमद फाजील अंसारी ऊर्फ शम्स जालनवी यांचे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. उर्दू व हिंदी साहित्य विश्वाला आपल्या हृदयस्पर्शी शायरीने समृद्ध करणारे हे शायर हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. आपल्या शायरीने कधीकाळी वर्तमानपत्राचा रकाना रंगविणारे हे शायर गेल्या पन्नास वर्षापासून वर्तमानपत्र विकून आपल्या संसाराचा गाडा चालवित होते. पहाटे चार वाजता उठून ते वृत्तपत्र जमा करून ते वाटप करीत होते.
सन १९४५ मध्ये जालना शहरातूनच १० वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले शम्स जालनवी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी लाहोर महाविद्यालयातून उच्चविद्या पदवी संपादन केली. शालेय जीवनापासून शायरीचे वेड लागलेले शम्स जालनवी हे नावाजलेले शायर होते. शकील बदायूनी, नौशाद, गुलजार आदी नामवंत शायरांसोबत शम्स यांनी भारतभर आपल्या हृदयस्पर्शी शायरीने श्रोत्यांना वेड लावले व त्यांची मने जिंकली होती. त्यांच्या शायरीतून वास्तव व करूणा आपल्याला हाक देते. शम्स यांनी जे पाहिलं, जे जगलं, जे भोगलं तेच त्यांनी आपल्या शायरीतून मांडलं.
जर्द जर्द चेहरे है। जख्म दिल के गहरे है। वक्त है तमाशाइ ।। वो तसल्ली देते है जखमों पर नमक रखकर। खूब है मसीहाइ।। बज्मे ऐशसे फुरसत । जब मिले चले आना। बेकसोकी दुनियाँमे । वक्त के मसीहाँ वो। नापकर बता देना । तुम गर्मों की गहरायी।। एक दौर वो भी था। शम्स मुझसे डरती थी। गर्दीसे जमाने की। मेरी कस्म पुर्सी पर । दोस्तो के दिल टूटे। दुश्मनों की बन आयी वो तसल्ली देते है। जख्मों पर नमक रखकर । खूब है मसीहा।
या त्यांच्या काव्यपंक्तीतून संघर्षमय जीवनाची हाक येते. त्यांच्या शायरीने त्यांना जगणे व संघर्ष शिकविला शिवाय जगण्याची उमेदही वाढविली.
आज फिर अहसासे गम ताजा हुआ। मिल गये थे जाने पहचाने बहुत ।। तेरे चेहरे का भरम खुल जाएगा । रास्ते मे है, आईना खाने बहुत ।। शम्स’ रखिए अपनी चादर का खयाल लग गऐ तूम पैर फैलाने बहुत।।
या त्यांच्या काव्यपंक्ती सामाजिक वास्तवतेचे भान दर्शवतात. ‘पृथ्वी ही शेषनागाच्या तळहातावर तरलेली नसून श्रमिक, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे.’ हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांगतात. खरच ही पृथ्वी श्रमिक व कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, हे ९४ वर्षीय शम्स जालनवी यांनी आपल्या शायरी सोबतच पोटाची खळगी भरतांना दररोज जगाला दर्शवून दिले.
कैसे गीत सूनाऊ मै बैरी बन गया जग ही सारा। किसको गले लगा लू मै। तूम तो पिया परदेस सिधारे। सपनो मे ही आ जाओ। रात विरहा की उनसी लगी है। मन कैसे बहलाऊ मै।
प्रेमाला जात-पात नसते. गरीब-श्रीमंतीचा भेदभावही नसतो. मात्र, प्रेमात विरह असतो हे त्यांच्या उपरोक्त काव्यपंक्तीतून दिसतो.
शम्स यांनी गरिबीशी संघर्ष केला. आपल्या शायरीतून अनेकांच्या जीवनात प्रकाश पेरणारे शम्स हे मात्र आयुष्यातील अंधारात चाचपडत राहिले. अंधाराशी सामना करतांना ते हतबल मात्र झाले नाहीत. संघर्षमय जीवन जगतांना शम्स यांनी आपली स्वप्ने कधीकाळी खूडून टाकलेली होती. स्वप्न न बघता वास्तविक जीवन जगणारे शम्स हे श्रमिक व कष्टकऱ्यांचे खरे नायक होते. त्यांच्या शायरीतून त्यांनी समाजाच्या वेदना मांडल्या.
मेरा मन कितना पागल है। काँटों से खुशबू की आशा। जहर से जीवन माँग रहा है ।। सूखे पेड से छाया माँगे। पत्थर दिलसे माया माँगे। गुंगेसे वो प्यारकी बोली। निर्धनसे धन माँग रहा है। मेरा मन कितना पागल है।। खुशबू कागज के फुलोंसे। थंडक भडके हुए शोलोसे। अंधोसे आखोंकी ज्योती। उससे दर्पन माँग रहा है। मेरा मन कितना पागल है। होती नही हर आशा पुरी। फिरभी बंधी है आस की डोरी।
पागल मनवा फिर पागल है। प्यार का आँगन माँग रहा है। मेरा मन कितना पागल है। बितें दिन नही लौट के आते। सुखे फुल नही मुस्काते। शम्स वो मेरी बुढी माँ से। मेरा बचपन माँग रहा है मेरा मन कितना पागल है। काँटोंसे खुशबू की आशा जहर से जीवन माँग रहा है।।
उपरोक्त काव्यपंक्ती आजच्या सामाजिक व वास्तविक जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
मैफिलीत चाहत्यांनी त्यांना भरभरून दाद दिली. मात्र, मैफिल संपताच शम्स यांचा जगण्यासाठीचा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. वास्तविक परिस्थितीशी संघर्ष करतांना कसं जगायचं हे सांगणारे शम्स हे चालते बोलते काव्यपीठ होते. अनेक ग्रंथ संपदा प्रकाशित असतांनाही कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवणारे शम्स हे एक उपेक्षित शायर होते.
आर्थिक अडचणी असल्याने त्यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनासाठी काही सामाजिक संस्था, राजकीय नेते मंडळींनी त्यांना मदत केली होती. शरीर थकले तरी मनाची उभारी आकाशात उंच भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे कायम ठेवणारे शम्स जालनवी हे याचे उत्तम उदाहरण होते. देशभरात आयोजित मुशायरा, साहित्य संमेलन आदी ठिकाणी उपस्थित राहून आपल्या शायरीने श्रोत्यांची मने जिंकणारे शम्स जालनवी यांना जालना शहरातील विविध सामाजिक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. नामवंत शायर आणि समिक्षकांनी शम्स जालनवी यांना’शहनशाह-ए-गझल’,’शान- ए- महाराष्ट्र’,’फक्रे जालना’,’शहंशाह-ए-तरन्नुम’आदी पदव्या दिल्या होत्या. त्यांचा दफनविधी आज जुना जालना विभागातील कब्रस्तानात झाला.