औरंगाबाद: शहरातील सूतगिरणी चौकात रस्त्यावर लघुशंका करून कोरोना प्रादुर्भाव वाढविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जवाहरनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घन:श्याम सोनवणे यांनी आज बुधवारी दिला.
गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकातील सार्वजनिक ठिकाणावरील मुख्य रस्त्यावर शहराच्या विविध भागांतून ये- जा करणारे लोक दुचाकी, चारचाकी थांबवून लघुशंका करीत आहेत. काहीजण कारच्या काचा बंद करून आत मद्यप्राशन करतात. या प्रकारामुळे परिसरातील व्यापारी, महिला, रहिवासी या प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत. लघुशंका करणाऱ्यांनी या ठिकाणास सार्वजनिक मुतारीचे स्वरुप दिले आहे. लघुशंका करणाऱ्यास विरोध केल्यास धमक्या, शिवीगाळ केली जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव थुंकी, लघुशंकेतूनही होत असल्याने हा प्रकार चिंतेचा बनला आहे.
पोलिस, मनपाकडून पाहणी:
जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक घन:श्याम सोनवणे, महापालिकेचे वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांनी बुधवारी सूतगिरणी चौकाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. फौजदार भरत पाचोळे, शिवाजी उगले, रवी जाधव, प्रवीण मुळे, नवाब पटेल आदी पोलीस कर्मचारीही उपस्थित होते.
मनपा करणार उपाययोजना:
रस्त्यावरील लघुशंका रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही महावीर पाटणी यांनी दिली. या प्रकाराची पोलीसांनीही गंभीर दखल घेतली आहे. लघुशंका करणाऱ्यांवर सुरुवातीला दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यानंतरही प्रकार सुरूच राहिल्यास महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पाटील, सोनवणे यांनी दिला आहे.