# बदल्या करण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; गाठी-भेटींना मिळणार वाव.

पुणे: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अधिकारी, कर्मचारी यांच्या नियतकालिक बदल्यांवर बंधने आली होती. तरीही शासनाने केवळ 15 टक्के बदल्या करण्याचे धोरण अवलंबले होते. यासाठी 31 जुलैपर्यंत बदल्या कराव्यात, असे जाहीर करण्यात आले होते. आता त्याला 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज गुरूवारी घेतला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सर्व सामान्यांसह राज्य शासनही आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे शासनाने यावर्षी अधिकारी, कर्मचारी यांच्या नियतकालिक बदल्या करायच्या नाहीत, असे ठरवले होते. कारण बदल्या केल्यास अधिकारी, कर्मचारी यांना टीए, डीए द्यावा लागला असता, यासाठी कोट्यवधी रुपयांचा बोजा शासनावर पडला असता. त्यामुळे बदल्या न करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने 7 जुलै रोजीच्या आदेशान्वये 15 टक्के बदल्या करण्याचे जाहीर केले होते. तसेच या बदल्या 31 जुलैपर्यंत करण्यात याव्यात, असेही त्यात म्हटले होते. त्यामुळे बदल्या करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला होता. काही विभागाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना आज शासनाने बदल्या करण्याच्या तारखेला 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

विशेष म्हणजे बदल्याच्या मौसमात मंत्रालयात मोठी वर्दळ वाढलेली असते. अनेक कर्मचारी, अधिकारी इच्छितस्थळी व क्रिम पोस्ट मिळवण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरतात. याबरोबरच राजकीय नेत्यांना भेटून दबावही आणत असतात. आमदार, मंत्री यांचे शिफारसपत्रही घेत असतात.  मात्र, सध्या कोरोनामुळे 31 जुलैपर्यंत लाॅकडाऊन आहे. गाठी-भेटी घेण्यावर बंधने आहेत. त्यामुळे बदल्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महसूल राज्यमंत्री कोरोना पॉझिटीव्ह:  महसूल विभागातील बदल्यांना जास्त महत्त्व असते. दरम्यान, राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते सध्या होमक्वारंटाइन आहेत. त्यामुळेही बदल्या करण्यास मुदतवाढ दिली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *