अंबाजोगाई: कोरोनाच्या संसर्गरोगावर येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमी परिसरातील रहिवाशांच्या विरोधामुळे पार्थिवावरील अंत्यसंस्कार रखडले आहेत. हा वाद मिटवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून अद्यापही हा वाद मिटवण्यात त्यांना यश आले नाही.
कोरोना रोगाचा सर्वत्र फैलाव वाढत असतांनाच अंबाजोगाई शहर आणि परिसरातही या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात २०० खाटांचे कोविड हाॅस्पिटल निर्माण करण्यात आले असल्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली येथील रुग्ण मृत पावला असता त्यावर तातडीने बोरुळा तलावावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, कोविड रुग्णांवर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार न करता स्वतंत्र स्मशानभूमी निर्माण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे नगर परिषद प्रशासनाने गांभिर्याने पाहीले नाही. बुधवार, २२ जुलैच्या रात्री आणि २३ जुलैच्या पहाटे एक असे दोन कोविड रुग्ण मृत झाल्यानंतर बोरुळा तलाव स्मशानभूमीत या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याच्या हालचाली सुरु झाल्यानंतर या पार्थिवावर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येवू नयेत, अशी भूमिका घेत त्या भागातील नागरिकांनी गर्दी केली.
त्यानंतर नगर परिषद प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नगर परिषद लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित येवून कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्टेडियममधील मोकळा भाग निश्चित करुन तेथे कायमस्वरूपी शेड उभे करुन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथे शेड उभारणीचे काम सुरू असतांनाच स्थानिकांनी तेथेही अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. आता नगर परिषद प्रशासन आणि महसेल प्रशासन कोविड रुग्णांसाठी शहराबाहेरील शासकीय गायरानातील मोकळी जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
मृतदेहांची फरफट; नातेवाईक ताटकळले: अंत्यसंस्कार करण्यास विरोध होत असल्यामुळे मृतदेहांची फरफट होत आहे. तसेच दु:खात असलेले नातेवाईकही ताटकळत बसले आहेत. कोरोनामुळे मृत पावलेले दोघेही रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते. मृत्यू पावलेल्या व्यक्तीपैकी एक अंबाजोगाई येथील हौसिंग सोसायटी विभागातील रहिवासी आहे तर तर दुसरी व्यक्ती ही सिरसाळा यथील रहिवासी आहे. या दोनही व्यक्तींचे पार्थिव अजूनही अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत आहेत.