# कोरोनामुळे उच्च शिक्षणाचा पॅटर्न बदलणार; नियोजनासाठी ‘टास्क फोर्स’ स्थापन.

औरंगाबाद: ‘कोविड १९’मुळे उच्च शिक्षणाचा पॅटर्नच बदलावा लागणार असून अध्यापन, मूल्यांकन यामध्ये मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. यासाठी विद्यापीठ स्तरावर ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतखाली शुक्रवार, २४ जुलै रोजी सकाळी बैठक झाली. या बैठकीत आगामी वर्षभरात केलेल्या विविध उपाययोजना यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. कोरोना साथीच्या पार्श्वभमीवर साडेतीन महिन्यांपासून विद्यापीठ मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसर येथील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग काही प्रमाणात बंद असले तरी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. आगामी काळात कोरोनानंतरचे शिक्षण खूप बदलणार असून यासाठी विद्यापीठ स्तरावर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या नियमित बैठका घेण्यात येतील व महत्वपूर्ण विषय मार्गी लावण्यात येतील. फिजिकल डिस्टन्स ठेवून कशा पद्धतीने अध्यापन, प्रात्यक्षिके, संशोधन, परीक्षा व मूल्यांकन करावयाचे याबद्दलचा निर्णय या माध्यमातून घेण्यात येईल, असेही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन उच्च शिक्षण विभाग या सर्वांशी समन्वय ठेवून निर्णय प्रक्रिया राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक नुकसान होणार नाही ही बाब लक्षात घेऊनच ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. ऑनलाइन बैठकीत प्र कुलगुरू डॉ प्रवीण वक्ते कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह टास्क फोर्सचे सर्व सदस्य सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *