# कोरोनाचं नाही, माणसांचं जास्त भय वाटतंय..! -हेमराज बागुल. 

कोरोनामुळे खूप लोकं हकनाक मेली, स्वतःची चूक नसताना. करोडोंची प्रॉपर्टी नावावर आणि गोतावळा गावभर असणाऱ्या एका भल्या गृहस्थाची डेड बॉडी अंत्यसंस्कारासाठी नेताना स्मशानाजवळ हातगाड्यावरुन रस्त्यावर पडली. ती उचलण्यास कोणी मिळेना. शेवटी सफाई कामगारांनी लांब काठ्यांनी ढकलत ती आत नेली. तो बिचारा मदतकार्य करताना दुसऱ्याच्या चुकीमुळे बाधित होऊन बळी पडला होता. विशेष म्हणजे स्वतः सर्व प्रकारची काळजी घेऊनही! कोरोना डेंजरस आहे तो याच एका कारणामुळे. दुसऱ्याच्या चुकीमुळे आपलं मरण ओढवू शकतं. धर्मशास्त्रातला कर्मसिद्धांत काहीही असला तरी दुसऱ्याच्या कर्माने मरणं आपल्याला साफ नामंजूर आहे! माणसाला केवळ स्वतःच्याच कर्माने मरण्याचा अधिकार असावा की नाही?

कोरोना हा खरोखरच महान समाजसुधारक! हजारो समाजसुधारकांचे काम त्याने एकट्यानेच केले. तो रोखण्यासाठी आपण वैश्विक झालो, विज्ञानवादी झालो, पूर्ण डिजिटल झालो. लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी हात धुणे, घरी थांबणे, नियमित काढा पिणे असं करत आपण सारेच संस्कारी आलोकनाथ झालो! या कालावधीत प्रदूषण कमी होऊन निसर्गाला त्याची स्पेस मिळाली. त्यामुळे माणसाकडून त्याला झालेल्या अनेक जखमा आपोआप भरुन निघाल्या. त्याने स्वतःच ओझोनचे छिद्रही बुजवले. जगातल्या कोणत्याही गव्हर्न्मेंटला टेंडर काढून ते बुजवणं नसतं शक्य झालं. त्याबद्दल मंडळ आभारी आहे!

कोरोनामुळे जगण्याचा अजेंडा आता पूर्ण बदलला आहे. भरधाव निघालेल्या गाडीला अचानक यू टर्न मारावा लागलाय! वर्तमानाचं चक्र एवढं उलट फिरेल असं वाटलं नव्हतं. साऱ्याच संकल्पनांची उलथापालथ झालीय. पॉझिटिव्ह असणं इतकं नकोसं आणि निगेटिव्ह असणंही इतकं हवंसं कधीच नव्हतं. शहरं मारणारी अन् गावं तारणारी ठरलीत. माणसांशी जवळीक हानीकारक तर दुरावा गरजेचा ठरलाय. पिकांऐवजी माणसांवर फवारणी करावी लागतेय. घरी रिकामं बसणंही देशकार्य सिद्ध झालंय. अपघात टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा ही वाहनांवरची सूचना आता माणसांवर लिहिण्याची वेळ आलीय. कारण दोन माणसे जवळ येऊनही संसर्गाचा जीवघेणा अपघात होऊ शकतो!

सर्व प्रार्थनास्थळांना कुलुपे लागली आहेत. कारण देवाने आपला अॅड्रेस चेंज केलाय. तो आता कोविड केअर सेंटरमध्ये राहतोय! डोक्यावर मरणभयाचं सावट घेऊन रुग्णसेवा करणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आदींसह अहोरात्र तैनात असलेले पोलीस, सरकारी अधिकारी-कर्मचारी या साऱ्यांच्या रूपात साक्षात देवच तिथे राबतोय ! आपण तो ओळखला नाही. कारण ब्रेकिंग न्यूजसाठी व्याकूळ झालेल्या मीडियाने आपल्याला तो दाखवला नाही. यापुढे मीडियाने घनघोर आत्मपरीक्षण करावं. बांद्र्यातल्या तैमूर-आराध्याला डिस्टर्ब न करता सुखेनैव खेळू द्यावं. तिथं तीन शिफ्टमध्ये लावून ठेवलेली ओबी व्हॅन तातडीने धारावीत आणावी. बड्यांची लिलावती-नानावटी आणि गरीबांची मसणवटी यातील अंतर दांडूधारी रिपोर्टरने आधी कमी करावं आणि मगच शिष्टपणे विचारावं, ‘काय सांगशील ज्ञानदा?’

अनेक छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मुळात त्या छोट्या समजणे हीच आपली मोठी चूक आहे. कुठेही थुंकणे, हात न धुणे आणि अस्वच्छ टॉयलेटस् या तीनच बाबींमुळे संसर्ग होऊन देशात दरवर्षी लाखो मरतात. तरीही आपण सर्व सार्वजनिक ठिकाणी पचापचा थुंकतो आणि सार्वजनिक संडास-मुताऱ्या अत्यंत बेशिस्तीने वापरतो. भारत महासत्ता होण्याची आपण सारे मोठ्या आतुरतेने वाट पाहतोय. आपल्याला महासत्ता होण्याची बिलकूल घाई नाही. दहा-वीस वर्षे उशीर झाला तरी चालेल. पण त्यापूर्वी लोकांनी व्यवस्थित आणि शिस्तीने हागावं, मुतावं आणि थुंकावं! भले त्यासाठी शाळेत एखादा बिनकामाचा विषय कमी करुन शिक्षण (आणि प्रशिक्षणही!) द्यावं. विशेषतः कार्यानुभवाचा तास तर असा जीवनानुभव देण्यासाठीच खर्च करावा. खरं जीवनशिक्षण हेच असतं हो. घाना आणि युगांडाचा भूगोल शिकून कोणाचं भलं झालंय?

स्वच्छ संडास ही सांस्कृतिक चैन नसून ती जीवनावश्यक गरज आहे! देशाला जेवढी गरज राफेल विमानांची आहे तेवढीच संडासांचीही आहे. महानगरांमध्ये एकेक सार्वजनिक संडास शेकडो लोक वापरतात. तोही आपापल्या युनिक पद्धतीने! धवल-नील-हरीत अशा विविध रंगांच्या क्रांत्यांनी साऱ्यांची पोटं पुरेशी भरलीत. आता ती सुव्यवस्थितपणे रिकामी करण्याचा प्रश्न आहे. तो सुटत नसल्याने अनेक महानगरांमध्ये जगणं सोपं आणि हागणं अवघड असं अभूतपूर्व द्वैत निर्माण झालंय. त्यासाठी देशात तातडीने संडास क्रांती झाली पाहिजे. बाकी या क्रांतीला कोणता रंग द्यावा याबाबत संबंधित तज्ज्ञांनी उचित निर्णय घ्यावा!

आपण थोर भंपक आहोत ! आपला प्रवास जगातल्या बिगेस्ट डेमोक्रॅसीकडून बिगेस्ट हिप्पोक्रॅसीकडे होतोय. कोरोनाविरोधात लढण्याच्या नावाखाली प्रत्येकजण आपापली अंगभूत खाज भागवतोय. कोणी त्याविरोधात गाणं म्हणतंय तर कोणी मोठ्या आवेशात कविता लिहतोय. जणू काही कोरोनाचा चिनी विषाणू चपट्या नाकाने व मिटमिट्या डोळ्यांनी त्यांच्यापुढे मांडी घालून शिस्तीत कविता ऐकायलाच बसलाय. देशभरात दररोज हजारो लोक मरणाच्या दारात जात असताना आपण साजरा केला तो कोरोनोत्सव! यादरम्यान लग्न केलेल्या काही मंडळींनी मोठ्या शहाजोगपणे आपले फोटो प्रसिद्ध केले ते मास्क लावून सोशल डिस्टन्स दाखवणारे. जसे काही हे दोन्ही मिलनोत्सुक जीव आता आयुष्यभर आपल्यातले सहा फुटाचं अंतर कसोशीने पाळूनच संसार करणार आहेत!

मास्क ही यापुढे सक्तीची वेशभूषा ठरेल. त्यामुळे साड्यांप्रमाणे या शेडमध्ये हा टाईप आणि या टाईपमध्ये ही शेड आहे का, असा प्रश्न विचारून बायका दुकानदाराला वैताग देतील. मास्कमुळे डोळ्यांनीच सारं व्यक्त करावं लागेल आणि डोळ्यांनीच माणूस ओळखावा लागेल ! स्थळं पाहतानाही नाकीडोळी नीटसऐवजी फक्त डोळी नीटसवर समाधान मानावं लागेल. त्यासोबत पुरुषांचं दातओठ खाणं अन् बायकांचं नाकतोंड पिळणं तर आता निरुपयोगीच ठरेल! कोरोनोत्तर कालखंडातीत एका महान शायरने किती छान म्हटलंय, ”सीख लो अब आखों से मुस्कुराना, क्योंकी होठों की मुस्कान तो मास्क ने छुपा ली!” साऱ्या जगाला मास्क घालायला लावून चांगलीचुंगली नाकं लपवायला भाग पाडणारे कोरोनाचे हे सारं षडयंत्र बसक्या नाकाच्या चीननेच आहे. याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अध्यक्ष महोदय!

थकलेली भूक रूळांवर गाढ झोपली होती. व्यवस्थेची गाडी धडधडत आली अन् रिकामी पोटं चाकांखाली कापली गेली. जित्याजागत्या माणसांपेक्षा डेड बॉड्या लवकर गावी पोहोचल्या. त्यांच्या घरातली कच्चीबच्ची आकांत करुन उपाशीच निजली असतील. कारण रोट्या रुळांवरच राहिल्यात!

जग निर्माण करायला किमान दोन शहाण्या व्यक्तींची गरज असली तरी ते नष्ट करायला एकच बेवकूफ पुरेसा असतो. वुहानमधल्या अशाच एकाकडून कोरोना जगभर पसरला. त्यातून आज मानव विरुद्ध विषाणू हे युद्ध पेटलंय. या घमासान युद्धात बळी पडणाऱ्यांची संख्या वाढती आहे. ती पाहताना जणू मरणाचा कराल जबडा दररोज विस्तारताना जाणवतोय. सातासमुद्रापारचं मरण आता दारात नव्हे घरात आलंय !

सारी मानवजात निर्धारी एकजुटीने लढली तरच हे युद्ध आपण जिंकू शकतो! मात्र, अशा परिस्थितीतही आपण मुर्दाड बेफिकिरीने वागतोय. आपलं सार्वजनिक जीवन बेशिस्तीनं सडलंय. कधी एखाद्या धर्माला टार्गेट करतो तर कधी कोण्या जातीला. पोटासाठी आलेला पण जीवाच्या भयाने गावी परतलेला भैय्याही डोळ्यात सलतो. असा जात-धर्म-प्रांतवादाने दुभंगलेला देश कसा मरणसंकटाशी लढणार ? त्यासाठी विद्वेषाचा व्हायरस तयार करणारे मेंदूतले मुतखडे आपल्याला तातडीने काढावे लागतील. ते काढले नाही तर या लढाईतला आपला पराभव आणि अंतही अटळच. त्याला कारणीभूत असतील ती मानवतेशी गद्दारी करणारी माणसेच. त्यामुळे मला कोरोनाचं नाही, माणसांचंच जास्त भय वाटतंय !
-हेमराज बागुल
8108970404

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *