पुणे: जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
जागतिक व्याघ्र दिन पाळण्याचा उद्देश हा आहे की, वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे. या दिवसाच्या निमित्ताने नांदेड येथील प्रसिद्ध छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच त्यांनी ताडोबा अभयारण्यात टिपलेली वाघांची छायाचित्रे त्यांच्या संग्रहातून खास maharashtratoday.live साठी उपलब्ध करून दिली.
राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या वाढली:
देशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघांची संख्या आहे. चौथ्या अखिल भारतीय वाघ जनगणनाच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.
मंगळवार, 28 जुलै रोजी प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या ६ व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण ३१२ वाघांची संख्या नोंदविण्यात आली आहे. यापूर्वीच्या प्रसिद्ध अहवालामध्ये २००६ मध्ये ही संख्या १०३, २०१० मध्ये १६८, २०१४ मध्ये १९० आणि आता २०१८-१९ च्या सर्वेक्षणामध्ये हा आकडा वाढून ३१२ झाला असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यामुळे भविष्यात व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रात वाढ होईल.