पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला. राज्यात 95.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या, राज्यात 96.91 टक्के विद्यार्थिनी तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसते. विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 3.1 टक्क्यांनी जास्त आहे. तर विभागवारी टक्केवारीत कोकण विभागाचा सर्वाधिक 98.77 टक्के, तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा 92 टक्के लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के लागला. विशेष म्हणजे
2020 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2019 च्या तुलनेने 18.20 टक्क्यांनी जास्त आहे.
विभागनिहाय टक्केवारी:
पुणे – 97.34%
कोकण – 98.77 %
नागपूर – 93.84%
औरंगाबाद – 92 %
मुंबई – 96.72 %
कोल्हापूर – 97.64%
आमरावती – 95.14%
नाशिक – 93.73%
लातूर – 93.7%
राज्यातील जवळपास 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी यंदा दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण 22 हजार 586 विद्यार्थी आहेत. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 मुले आणि 7 लाख 89 हजार 894 मुली आहेत. तर एकूण 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यंदा 3 ते 23 मार्च दरम्यान, दहावीची लेखी परीक्षा राज्यातील चार हजार 979 परीक्षा केंद्रांवर पार पडली. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. या निकालाची प्रिंटआउटही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
सोमवारपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. या अर्जाचा नमुना
www.maharesult.nic.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुणपडताळणीसाठी 8 ऑगस्टपर्यंत; तर छायांकित प्रतीसाठी 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे बंधनकारक आहे. ही प्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकड अर्ज करावा.
ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल.
गुणपडताळणीसाठी: 30 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल.
छायाप्रतीसाठी: 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल.
उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यापुढील पाच दिवसांत अर्ज करावा.
दहावीत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2020 आणि मार्च 2021 अशा दोन संधी उपलब्ध राहतील.
खालील संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल:
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com