पुणे: राज्यातील कोकण, मध्यमहाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात 3 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता अधिक आहे, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या बहुतांश भागात गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत. पेरण्या पूर्ण होण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भागापासून ते दक्षिण आंध्रप्रदेश आणि उत्तर तेलंगणापर्यंत असलेली द्रोणीय स्थिती आता आंध्रप्रदेशाची दक्षिण किनारपट्टी आणि उत्तर तमिळनाडूच्या भागावर आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते दक्षिण मध्य प्रदेश पार करून उत्तर मध्यमहाराष्ट्रापर्यंत आणखी एक द्रोणीय स्थिती आहे. तर पश्चिम विदर्भ पार करून दक्षिण आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत असलेली द्रोणीय स्थिती कुमकुवत झाली आहे. असे असले तरी उर्वरित दोन द्रोणीय स्थितीमुळे राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.