# देशात 94 ते 106 टक्के पाऊस होणार; हवामानशास्त्र विभागाचा तिसरा अंदाज.

पुणे: भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी पावसाचा तिसरा अंदाज जाहीर केला. मात्र, तो निराशाजनक आहे. कारण जून, जुलै सारखाच सर्वसामान्य पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पडेल असा आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीसारखा पूर येण्याची शक्यता कमीच आहे. हवामान विभागाने 94 ते 106 टक्के इतका पाऊस या दोन महिन्यात होईल असे जाहीर केले आहे. त्यातही 8 टक्के कमी जास्त पाऊस राहिल असेही म्हटले आहे.

राज्यात मागील वर्षी मध्यमहाराष्ट्र , कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला होताच शिवाय राज्यातील बहुतांश भागातील नद्यांना महापूर आले होते. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हा भाग पाण्याखाली होता. त्यामुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

यावर्षी मात्र, पावसाचे प्रमाण अगदी जून महिन्यापासूनच साधारण आहे. त्यातच शुक्रवारी हवामानशास्त्र विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचा म्हणजेच मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, तो सुध्दा साधारणच आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसावरच मदार आहे.

परतीचा चांगला पाऊस पडण्याची शक्यता:
यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ढगाळ वातावरण व हलका पाऊस होता. त्यामुळे तापमान कमी होते. जेवढे जास्त तापमान तेवढा हवेचा दाब कमी होतो व वारे वेगाने वाहून मान्सूनला गती मिळते. यंदा 1 ते 3 अंशांनी भर उन्हाळ्यात तापमान कमी होते. त्याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे. आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये परतीचा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *