ऐतिहासिक, सांस्कृतिक, मनोहर अंबानगरी पर्यटन नगरी होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज
हिरवाईने नटलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा तेथून वाहणारे धबधबे व निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ घालणारे
अंबाजोगाई हे बालाघाटच्या डोंगररांगाच्या कांही अंतरावर वसलेले शहर आहे. आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी व सर्वज्ञ संत दासोपंत यांची समाधी याच डोंगर भागात आहे. अनेक हेमाडपंथी मंदिरे या डोंगर भागात आहेत. अमृतेश्वर, नागनाथ, बुट्टेनाथ, नागझरी, डोंगरतुकाई, धारोबा, रेणुकाई, कांही सुफीसंताचे दर्गे याच डोंगरावर व दऱ्यातून वसलेले आहेत. ऐतिहासिक, धार्मिक स्थळे असलेल्या मनोहर अंबानगरीतून एकमेव नदी उगम पावते तिचे नाव जयवंती नदी. पण डोंगर भागात पाऊस पडला की अनेक भागात छोटे छोटे ओढे वाहतात ते या नदीला मिळतात. अंबाजोगाई हे शहर पूर्व पश्चिम दिशेने लांब व दक्षिण उत्तर दिशेला एक लवणावर वसलेले असल्याने पावसाचा व सांडपाण्याचा थेंबनथेंब कुठेही न साचता वाहून जातो तो जयवंती नदीतून. पुढे ही नदी धारूरच्या डोंगरातून उगम पावलेल्या वाण नदीला बुट्टेनाथ संगमावर विलीन होते व पुढे नागापूर येथे मोठ्या साठवण तलावापर्यंत खळखळ वाहते. तिथून सपाट जमिनीवरून गोदावरीला पुढे मिळते. नागनाथ मंदिराच्या मागे डोंगर आहे तिथे १०० फूट उंच असा धबधबा आहे. तो दोन टप्प्यात येतो. पुढे कांही अंतरावर 20 फुटाचा एक धबधबा आहे. त्या धबधब्याचे पाणी नागनाथ महादेव मंदिराच्यामागून वाहत जयवंती नदीला मिळते. उंच उंच डोंगर व मध्ये हे धबधब्याचे वाहते पाणी व हिरवेगार झालेला परिसर मोहक दिसत आहे.
आद्यकवी मुकुंदराज समाधी ही घोडदरीच्या कपारीत आहे. निमुळते अतिउंच डोंगर आजूबाजूला आहेत. त्या डोंगरासमोर वाहणारे पावसाचे पाणी छोट्या छोट्या धबधब्याच्या रूपाने अत्यंत मोहक रूप धारण करून दरीत कोसळत असतात. त्याचा मंजुळ व कधी खळखळाट करणारा आवाज व पाण्याचे शुभ्रधवल रंगछटा माणसाला मोहीत करतात. याच दरीत शहरातील पावसाचे पाणी व वाहून येणारे सांडपाणी याच दरीत एक उंच ठिकाणावरून दिसू शकत नसलेल्या दरीत धबधब असा भीषण आवाज करीत वाहते. तो ही पाण्याचा स्रोत पाहण्यासारखाच असतो.
अंबाजोगाईच्या मांडवा रोडवर अनेक पाण्याचे वाहते प्रवाह आहेत व पुढे पाणी डोंगरदरीतून उतरते. त्यात एक दरी आहे डोंगरतुकाई. इथे तुकाई नावाच्या देवीचे मंदिर आहे. त्याला खेटूनच एक उंच डोंगर आहे. त्याच डोंगरून एक भव्य उंच असा मनमोहक धबधबा आहे. चारी दिशांनी गोल डोंगर व त्यात हा धबधबा नजर खिळवून ठेवतो. पांढरे शुभ्र पाणी आणि त्याचा एकसारखा आवाज आसमंतात घुमत राहतो. धबधब्याच्या पाण्या शेजारी गोल आकारात नैसर्गिक दगडी फरशी आहे जिथे ५०० पेक्षा जास्त माणसे बसून आनंद घेऊ शकतात. इथे जेवण आणून वन भोजनाचा मनस्वी आनंद घेता येतो. लहान मुलांना पण सहज इथे नेता येते.
याच रोडवर पूर्वेला काळवटी साठवण तलाव आहे. त्याच्या सांडव्यातून वाहण्याऱ्या पाण्याचा प्रवाह एका दरीकडे जातो. तिथे काजळतोंडी १५ फूट उंचीचा फारच देखणा धबधबा आहे. सुंदर व स्वच्छ पाणी हे या धबधब्याचे खास वैशिष्ट्य आहे. चंद्रकोरी आकाराच्या या डोंगराच्या भोवती हिरवीगार देखणी जमीन व रंगबिरंही शंखनाद फुले व छोटा गुलमोहर लाल व पिवळ्या रंगाचा आपल्याला आकर्षित करते. आणि याच मांडवा रोडच्या उजव्या बाजूस काळभैरव मंदिर आहे. खड्या उंच डोंगरावरून उतरून मंदिरापर्यंत जाता येते. पुढे डोंगर उतरून वाण नदीचे खोल पात्र आहे. त्यात उन्हाळ्यातही भरपूर पाणी उपलब्ध असते. ते पाणी जनावरांना व पक्षांना पुरेसे आहे.
या सगळ्या अंबाजोगाईच्या परिसरात मोर, हरीण, साळिंदर, ससे व नीलगाय हे प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. याच डोंगरात वेगवेगळी औषधी जडिबुट्टी सापडते. ३०० पेक्षा जास्त वेगवेगळे पक्षी या पंचक्रोशीत आहेत. असं निसर्गाचं देणं लाभलेल्या अंबाजोगाई परिसरात हे डोंगर, नद्या, नाले, ओढे, पक्षी, प्राणी, जंगल औषधी वनस्पती निसर्गाची मोठी देणं आहे. पर्यटन करण्यास आपण महाबळेश्वर व इतर ठिकाणी जातो. पण चांगला व भरपूर पाऊस झाला तर पावसाचा व धबधब्याच्या, हिरव्यागार डोंगराचा आपण मनमुराद आस्वाद घेऊ शकतो. भविष्यात याभागात पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकते. त्यासाठी आमदार, खासदार, मंत्री व जागरूक नागरिकांनी लक्ष दिले तर ते होऊ शकते.
-दगडू लोमटे, अंबाजोगाई
लेखक ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आहेत.
मोबाईल: 9823009512
ईमेल: ybc.dbl@gmail.com