औरंगाबाद: १ ऑगस्ट २०२०, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचा जन्म शताब्दी महोत्सव. मागील अनेक महिन्यांपासून सामाजिक माध्यमातून त्या निमित्ताने सतत उपक्रम आयोजित होत आहेत. अनेक व्याख्याते, साहित्यिक व विचारवंत यांची व्याख्याने ऐकायला मिळाली. अगोदरही अण्णा भाऊंचे व त्यांच्या कार्याविषयी काही थोडेफार साहित्य वाचलेले आहे. मात्र, या व्याख्यानातूंन अण्णा भाऊ पुढे समजण्यास अधिकची मदत झाली. अण्णा भाऊ साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील एक उतुंग व्यक्तिमत्त्व होते हे मनोमन पटत गेले. जरी ते औपचारिक शिक्षण घेवू शकले नाही तरी त्यांचे शैक्षणिक महत्व उच्च कोटीचे असेच आहे याची जाणीव त्यांना वाचले व समजून घेतले तर नक्कीच होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने फेसबुकवर लाईव्ह आयोजित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समारोप ऑनलाईन व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प “अण्णा भाऊंचे क्रांतिकारकत्व” या विषयावर प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी सुंदर रीतीने गुंफले. याप्रसंगी त्यांनी ‘२० व्या शतकात अशा तीन महनीय व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत की ज्यांनी कधी शाळा अनुभवली नाही. परंतु सृजनाचे एक स्वतंत्र विद्यापीठ म्हणून या तीनही मंडळींनी आपल्या सृजनाचा ठसा मराठी वाङ्मयाच्या प्रांतामध्ये उमटविला. बहिणाबाई चौधरी, वामनदादा कर्डक आणि अण्णा भाऊ साठे ह्या त्या तीन व्यक्ती होत” असे उद्गार काढले. त्याच क्षणी माझ्या मनात एक प्रश्न पडला की अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने एखादे विद्यापीठ आहे का? इंटरनेटवर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि घोर निराशा झाली. त्यांच्या नावाने काही महाविद्यालये तर काही विद्यापीठांत अध्यासान केंद्रे जरून दिसली. परंतु एकही विद्यापीठ असे दिसले नाही की ज्याला अण्णा भाऊंचे नाव आहे. अण्णा भाऊ साठे विद्यापीठ असावे अशी गरज नाही का? असा प्रश्न पडतो.
आज त्यांची जन्म शताब्दी साजरी होत असताना त्यांचे नावे निदान एखादे मुक्त विद्यापीठ तरी असावे असे वाटते. मला वाटते अण्णा भाऊंचे एकंदरीत सर्व परंतु खास करून कामगार चळवळीतील योगदान आणि कामगारांना शिक्षण संपादनातील आज असलेल्या अडचणी लक्षात घेता “अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठ” स्थापन व्हावे जेणेकरून त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करता येईल. हे सूचित विद्यापीठ एसएनडीटी महिला विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर स्थापन करता येईल. एसएनडीटी जसे महिलांसाठी शैक्षणिक कार्य करते तसे अण्णा भाऊ साठे कामगार मुक्त विद्यापीठ कामगारांसाठी शैक्षणिक कार्य करू शकेल. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर “मुक्त” असे असल्यास कामगारांना आपले शिक्षण संपादन करता येईल. याद्वारे अण्णा भाऊंना एक प्रमाणिक आदरांजली तर नक्कीच देता येईल परंतु त्यासोबतच एक शैक्षणिक-औद्योगिक क्रांतिसुद्धा साकार करता येईल!
प्रा.श्रीकिशन मोरे, औरंगाबाद
लेखक एमपी लाॅ काॅलेज येथे उपप्राचार्य आहेत.
मोबाईल: 9325228041