औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाच्यावतीने आयोजित संवाद मालिकेत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ हे मंगळवार, 4 ऑगस्ट रोजी सहभागी होणार आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनच्या काळात विभागाच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांशी झूम अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद साधण्यात येत आहे. या मालिकेत पी. साईनाथ हे ‘लॉकडाऊनचा संपूर्ण भारतावर तसेच पत्रकारितेवर झालेला परिणाम’ या विषयावर मंगळवारी दुपारी चार वाजता संवाद साधणार आहेत. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या प्रसिद्ध ग्रंथाचे ते लेखक असून द हिंदूच्या ग्रामीण आवृत्तीचे संपादक राहिलेले आहेत. सध्या परी या संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य ते करीत आहेत. या ऑनलाईन संवादात सहभागी होण्याचे आवाहन, विभागप्रमुख डॉ. दिनकर माने यांनी केले आहे.