हिंगोली: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता 6 ते 19 ऑगस्ट दरम्यान कडक लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज घडीला जिल्ह्यात रुग्ण संख्या सातशेवर पोहचली आहे. यावर प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने संख्या वाढतच आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी जयवंशी यांनी महत्वाची घोषणा केली आहे. 6 ते 19 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या दरम्यान आपत्कालीन व्यवस्थेतील आस्थापना सुरु राहतील. बँक, शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. याचबरोबर संचारबंदीच्या दरम्यान जिल्ह्यातील बाजारपेठांमधील मोठे व्यापारी तसेच किरकोळ व्यापारी यांच्या अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांनी ही टेस्ट केलेली असेल त्यांनाच व्यापार करता येणार आहे. यासंदर्भात या व्यापाऱ्यांच्या तपासणीकरिता शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून. तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, नागरिकांना संचारबंदीपूर्वी आवश्यक साहित्य व कामे पूर्ण करणे शक्य व्हावे याकरिता आज संचारबंदीची घोषणा केली असून 6 ऑगस्टपूर्वी नागरिकांनी आपापली कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.