अयोध्येमध्ये राममंदिर निर्माण कार्यास सुरुवात झाली, त्याबद्दल अभिनंदन… अभिनंदन त्यांचे जे खरे रामभक्त आहेत, श्रद्धाळू आहेत.. अभिनंदन त्यांचेही ज्यांना हा रक्तरंजित प्रवास चुकीचा वाटला, अभिनंदन त्यांचेही ज्यांना आता तो सर्व इतिहास मागे ठेवायचा आहे आणि देश पाकिस्तान-सिरियासारखा होऊ नये, अशी ते त्या रामाजवळच प्रार्थना करतात.
तीन दशकं देश गढूळ करणा-यांचा तिटकारा करणारे पण अंतिम निर्णय न्यायालयाच्या माध्यमातून घेतला गेला. लोकशाही प्रक्रियेने झाला याचा आनंद वाटणारे- त्यांचेही अभिनंदन…अभिनंदन त्या सरळ-सामान्य भाविकांचे ज्यांना अद्याप या घटनेतील राजकारण समजले नाही आणि त्यांना फक्त राम दिसतो जो न्यायप्रिय आहे..अभिनंदन त्यांचे अजिबात नाही जे राजकीय भांडवल म्हणून रामाकडे पाहतात, जे संघवाले आणि मोदी भक्त आहेत.. ज्यांना मोदी राम आणि छत्रपती शिवाजीराजेंपेक्षाही मोठे वाटतात…. जे गावातल्या, आपल्या घराजवळच्या राममंदिरात कधीच जात नाहीत, तिथे दिवा-बत्ती करत नाहीत पण अयोध्येत मंदिर व्हावं आणि ते ही भाजपने करावे असा आग्रह धारणा-यांचे अभिनंदन अजिबात नाही..त्यांचेही नाही जे म्हणाले की- पहिल्यांदा राम मंदिराचे काम राजीव गांधी आणि पर्यायाने काँग्रेसने केले..अभिनंदन त्यांचेही जे संघ-भाजपमध्ये आहेत पण आता त्यांनी धार्मिक राजकारणात वापरले जाणारे असे विषय नको वाटतात.. अभिनंदन त्यांचे अजिबात नाही जे काँग्रेस-गांधीवादी- सपा-डावे-समाजवादी-आंबेडकरवादी-दलित आहेत पण ते तिथे राहून काम मात्र हिंसक जात-धर्मवाद पेटण्याचे करत असतात, अभिनंदन त्यांचे ज्यांनी शुभारंभाचा कार्यक्रम एक पक्ष-एक संघटना आणि एका व्यक्तीचा झाला असतानाही त्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांला बोलावले ज्याने आयुष्यभर बेवारस प्रेतांवर जात-धर्म न पाहता अंत्यसंस्कार केले.. आणि अभिनंदन बलबीरसिंगचेही जो कारसेवक होता, त्याने बाबरीवर हाथोडा चालवला आणि आज मोहंमद आमीर होऊन एक हजार मशिदी दुरूस्त करण्याच्या कामात मग्न आहे आणि त्या नवाबाचेही ज्याने राममंदिर निर्माण कार्यास मोठी देणगी दिली…
सरसकट कुणाचे अभिनंदन करावे..? किवा सरसकट दु:ख करावे..? किवा कुणाला दु:ख झाले असेल असा संकुचित विचार करुन उन्मादित व्हावे..? हा दिवस तसा नक्कीच नाही..आजही भारतातला बहुसंख्य हिंदू हा सहिष्णू आहे आणि आक्रमणका-यांचा जो काही खरा-खोटा इतिहास त्याच्या समोर आहे- त्यापलीकडे जाऊन त्याला भारत नीटपणे उभा रहावा असे वाटते, आणि आजही या देशातला संपूर्ण मुसलमान समाज आतंकवादाचे समर्थन करत नाही.. त्याच्या विरोधात रोज अपप्रचार सुरु आहे पण आजही त्याला त्याच्या पूर्वजांनी पाकिस्तान नाकारुन भारतात राहण्याचा निर्णय योग्य वाटतो..तो 1988 पासून राम मंदिराच्या आंदोलनाने देश भरकटला आणि त्याच्यावरील दबाव वाढला, अन्यायग्रस्त असल्याची भावना झाली तरीही हे अनुभव टाकुन पुढे चालू लागला..या घटनांनी अतिरेकी घडवले आहेत पण दोन्ही बाजूंनी..! एक बाजू पाहणा-यांना ते दिसणार नाही.. समाजाची घट्ट वीण सैल झाली..द्वेष-परस्पर अविश्वास वाढला..हे ही सत्य आहे…पण यापलीकडे एखाद्या मोहल्याच्या टोळक्यात एखादा प्रदीप-एखादा संजय असतो आणि गणपती-दुर्गा उत्सव मंडळात एखादा सादिक-जावेद असतो..
थोडक्यात त्यांच्यावर गेल्या तीस वर्षात झालेल्या प्रचंड प्रचार-अप्रचाराचा काहीच परिणाम झालेला नसतो.. अशाच सगळं मागे टाकून-विसरुन पुढे जाण्याचा विचार करणा-या समस्त भारतीयांचे अभिनंदन…!!
– रफ़ीक मुल्ला, वरिष्ठ पत्रकार
मोबाईल: 9920907744