पुणे: पावसाला अनकूल स्थिती असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील मुंबईसह कोकण, मध्यमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिवृष्टी असा पाऊस हजेरी लावीत आहे. तर मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, 8 ऑगस्टपर्यंत मध्यमहाराष्ट्र व कोकणात मुसळधार तर घाटमाटमाथ्यावर अतिवृष्टी तसेच मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. विशेष म्हणजेे आज सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत तब्बल 270 मिमी पाऊस झाल्याने मुंबईतील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार तर उर्वरित भागातील जिल्ह्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी या भागात कमी दाबाच पट्टा कार्यरत आहे. मात्र, त्याची तीव्रता कमी होत चालली आहे. तसेच दक्षिण गुजरातपासून दक्षिण छत्तीसगड, विदर्भ आणि मध्यमहाराष्ट्रापर्यंत चक्रीय स्थिती व कमी दाबाचा पट्टा असून त्याचीही तीव्रता आता कमी झाली आहे. या दोन्ही स्थितीच्या तीव्रता कमी होत असल्यामुळे पाऊस ओसरत चालला आहे, असे हवामान विभागातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.
राज्यात 6 ते 8 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस: राज्यात 6 ते 8 ऑगस्ट या कालावधीत सर्वदूर मध्यम ते मुसळधार असा पावसाचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर कोकणात अतिवृष्टी तर मध्यमहाराष्ट्रात मुसळधार तसेच मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या चोवीस तासात राज्यात पडलेला पाऊस मिमी.मध्ये: मुंबई- 270, भिरा, मंडणगड, पेडणे, वसई-170 प्रत्येकी, माणगाव, रत्नागिरी, पाली-160 प्रत्येकी, दापोली, गुहागर, केपे, सावंतवाडी-140 प्रत्येकी. चिपळूण, ठाणे, उरण, वेंगुर्ला- 130 प्रत्येकी, राजापूर-120, कुडाळ-110, खेड, महाड, श्रीवर्धन -100 प्रत्येकी, अलिबाग, अंबरनाथ, माथेरान-80 प्रत्येकी, महाबळेश्वर -190, गगनबावडा-150, आजरा, चांदगड, राधानगरी-190 प्रत्येकी, लोणावळा- 80, अर्जनी-70, आरमोरी, ब्रम्हपुरी-50 प्रत्येकी,
घाटमाथा: ताम्हीणी-210, डुंगुरवाडी-180, दावडी-160, शिरगाव, कोयना-130 प्रत्येकी, खोपोली-90, लोणावळा-80 मिलिमीटर.