पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डांसह देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका पुढील सहा महिने लांबणीवर पडल्या आहेत. केंद्र सरकारने यासंंबंधीचे आदेश जारी केले असून, कॅन्टोन्मेंट बोर्डांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत सध्याच्या नगरसेवकांचा कार्यकाळ वाढणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने लष्कराच्या चारही मुख्यालयांना यासंंबंधीची अधिसूचना पाठविली आहे. प्रशासकीय कारणांमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डांची निवडणूक घेणे सध्यातरी शक्य नाही, असेही सूचित केले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डांसह देशभरातील ५६ कॅन्टोन्मेेंट बोर्डांच्या सदस्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. हा कार्यकाळ संपण्याअगोदरच केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी फेब्रुवारीमध्ये सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डांतील निवडणुकीच्या हालचाली थंडावल्या आहेत. त्यातच सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीतही निवडणुका घेणे शक्य होणार नाही.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार, तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनीही पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्राकडून पत्र आल्याचे सांगितले.