निष्ठेने कर्तव्य बजावणारा एक तरुण डॉक्टर कोरोनाने बाधित झाला. दाराशी ॲम्बुलन्स आली. त्याने घराबाहेरुनच बायको-मुलांसोबत उत्साहात खट्याळ सेल्फी घेतली. ‘काळजी करु नका … लवकरच येतो’ अशा आशादायी शब्दात निरोप घेतला. बारीक-सारीक सूचना देताना ‘कपडे प्रेस करुन ठेव’ असंही पत्नीला सांगून गेला. नंतर तो घरी परतलाच नाही. हॉस्पिटलमधूनच परस्पर…! आजही कपाटातल्या कपड्यांची घडी त्याची वाट पाहतेय. मात्र, परिवाराची घडी कायमची विस्कटलीय ! कॉलनीत कधी अॅम्बुलन्सचा सायरन वाजतो अन् त्याची दोन्ही अजाण बालके बापासाठी गेटवर धावत जातात. त्यांना आजही आशा आहे. आपला पप्पा कधीतरी येईल आणि पुन्हा एक छानसी सेल्फी घेईल!
कोरोनाच्या लढाईत असे अनेक सेवाभावी डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कामगार धारातिर्थी पडलेत! केवळ मुंबई महापालिकेचे सुमारे 125 आणि पोलिस दलातले 110 जाँबाज मृत्युमुखी पडलेत. हे सारे शहीदच. कर्तव्यावरील हजारो कर्मचारी बाधित झालेत! शासकीय यंत्रणेने या आपत्तीत पुरेपूर सेवाभाव दाखवला आहे. अगदी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून ! नळाला पाणी येतंय. लाईट सुरू आहेत. कचरा उचलला जातोय. शासकीय हॉस्पिटल्स सेवारत आहेत. पोलिस बंदोबस्तावर आहेत. खासगी क्षेत्र ठप्प झालं असताना सरकारी यंत्रणा मरमर राबतेय. लोकांना जगविण्यासाठी अहोरात्र धडपडतेय. जिची आपण कायम कुचेष्टा करतो. ज्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या 4-5 टक्के महागाई भत्त्याचे स्वागत आपण ‘बाबूंची दिवाळी’, ‘बाबूंची धमाल’ अशा शीर्षकाच्या बातम्यांनी करतो. यावेळी तरी त्यांना कृतज्ञतेने एक सॅल्यूट द्या, यार !
माणूस विरुद्ध विषाणू ही खुन्नस हजारो वर्षापासूनची. जगाच्या इतिहासात माणसांची सर्वाधिक कत्तल विषाणूंनीच केलीय. त्यांनी साम्राज्ये उलथवण्यासोबत संस्कृत्याही नष्ट केल्या आहेत. अलिकडे तर विषाणूंच्या फौजांची आक्रमणे ‘और तेज’ झाली आहेत. बर्ड फ्लू, इबोला, सार्स, स्वाईन फ्लू… ही सारी आक्रमणे आपण परतवून लावली. मात्र, कोरोना हा विषाणूंमधला चेंगीझ खान आहे. या क्रूरकर्म्याप्रमाणेच तोही जग उद्ध्वस्त करायला निघालाय. गेली सहा महिने त्याच्याशी सुरू असलेला संघर्ष म्हणजे जणू एक जागतिक महायुद्धच ! त्यातील बळींची संख्या रोज वाढतेय. अन् इकडे लोकांची भीड मात्र चेपत चाललीय. कोरोनासोबत जगायचं म्हणजे त्याच्या गळ्यात गळा नसतो घालायचा हो !
कोरोना चीनमध्ये असताना मी इथे निर्धास्त असतो कारण तो भारतात नसतो. देशात आला तरी राज्यात नसतो. राज्यात असताना माझ्या शहरात नसतो आणि शहरात असताना मोहल्ल्यात नसतो. मोहल्ल्यात आला तरी तो माझ्या घरात नसतो! आणि जेव्हा तो शेवटी माझ्या घरात येतो तेव्हा मी नशीब वा सरकारच्या नावाने बोंब मारतो!
काहींना तर फार मोठा डाऊट आहे की कोरोना हे एक षडयंत्र तरी आहे अथवा हे सारं खोटं आहे. पृथ्वी गोल नसून सपाटच आहे असे मानणारे अनेक लोक जगात अजूनही आहेत. इंग्लंड-अमेरिकेत त्यांनी चक्क संस्थाही स्थापन केल्या आहेत. कोरोनाला खोटं ठरवणारी ही मंडळी बहुधा या संस्थांची लाईफ मेंबर असावीत. काही लोकांना नको तिथे संशय येतो आणि जिथे संशय यायला हवा तिथे डोळे झाकून विश्वास ठेवतो. जाऊ द्या आपला लढा रोगाशी आहे, रोग्याशी नाही!
प्रत्येक जगण्याच्या दारावर आता मरण दस्तक देतंय. जगातील 215 देशांमध्ये कोरोना पोहोचला आहे. फक्त अंटार्क्टिकावर तो पोहोचला नाही. कारण तिथे माणूसच नाही! इतक्या कमी वेळेत कोणीही असं जगभ्रमण केलेले नाही. त्यामुळेच कोरोनाची लस शोधण्यासाठी जगभरातल्या साऱ्या बड्या कंपन्या झटताहेत. या संस्थांसोबत गावाबाहेर तंबू ठोकून बसलेले हजारो खानदानी आयुर्वेदिक दवाखानेही अहोरात्र संशोधन करीत आहेत. हजारो कोटी खर्च होताहेत. त्यात त्यांना यश येईलही. मात्र, लस सापडल्यावर आपण पूर्वीसारखेच बेशिस्त आणि बेजबाबदार वागणार आहोत का? आरोग्याची काळजी ही आपली कायमची सवय नाही होऊ शकत ?
कोरोना ही जैविक आपत्ती. तिसरं महायुद्ध जर झालंच तर ते आता आण्विक नव्हे जैविक होणार असल्याची चाहूलच जणू या आपत्तीने दिलीय. यापुढे देशाची जैविक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरेल. त्यात आपला पंगा विषाणूंची फॅक्टरी असणाऱ्या चीनशी आहे. अशी लढाई सैनिकांपेक्षा नागरिकांनाच जास्त लढावी लागते. मात्र, बेफिकीर पब्लिकचा अनुभव निराशाजनक आहे. ‘हात धुवा-मास्क लावा’ एवढी साधी गोष्ट चार महिन्यांपासून जीव तोडून सांगावी लागतेय. यापुढे तरी सरकारला असं सारंच बाळबोध सांगावं लागू नये. समजा उद्या एखाद्या असभ्य विषाणूने मानवी शरीरात रुढ मार्गाने प्रवेश न करता उलट्या दिशेकडून केला तर लोकांनी ढुंगण स्वच्छ धुवावे हेही सरकारनेच सांगावं काय ?
लॉकडाऊनचा लोकं उगाच बाऊ करतात. तो काही पर्मनंट उपाय नाही हे सरकारलाही ठाऊक आहे. क्रिकेट मॅचमध्ये पहिल्या दहा ओव्हरमध्येच पाच विकेट पडल्यानंतर धावा काढण्यापेक्षा विकेट टिकवणं जास्त महत्त्वाचं असतं. लॉकडाऊन हा जगण्याच्या पीचवर स्वतःची विकेट टिकवण्याचा मार्ग आहे. मॅच जिंकण्याचा नाही. ती जिंकण्यासाठी तुम्हाला धावाच काढाव्या लागतील आणि फटकेबाजीसाठी क्रिज सोडण्याची रिस्कही घ्यावी लागेल. मात्र, तसं करताना कोरोनाकडून यष्टिचीत होऊ नका. स्ट्रॅटेजीने जगा राव …कशाला उगाच मस्ती करतात. मास्क लावला तर उंदीर वाचू शकतो. नाही लावला तर हत्तीही मरू शकतो !
मानवी स्पर्श हे सृष्टीतलं सर्वश्रेष्ठ सौख्य अन् ती सर्वाधिक सुंदर संवेदनाही! आपण सारे स्पर्शाचे भुकेले असतो. मात्र, कोरोनामुळे अनेक स्पर्श दुरावलेत. हे स्पर्श किती इंद्रधनुषी असतात. स्नेह, वात्सल्य, आधार, दिलासा, प्रेम, धीर, विश्वास… अशा साऱ्याच भावना त्यातून व्यक्त होतात. कोणी स्नेहभावनेने हात हातात घेतो तर कोणी विश्वासाने खांद्यावर हात ठेवतो. कोणी कौतुकानं पाठीवर थाप देतो. तर कोणी प्रेमानं मस्तक कुरवाळतो. कधी काळी चहापोहे घेताना झालेला तो करंगळीचा स्पर्श तर खूप जणांना अजूनही आठवतो! याबाबतीत मी आता फार खोलात जात नाही. आपण जास्त जाणकार आहात. पण यापुढे मुन्नाभाईची ‘जादू की झप्पी’ बाद होईल हे मात्र निश्चित. चित्रपटात नाचणारी हिरो-हिरॉईन फिजिकली जवळ येताच स्क्रीनवर सोशल डिस्टन्सिंगचा संदेश झळकेल!
दोस्तांनो, मी तुम्हाला काही महान तत्त्वज्ञान सांगितलेलं नाही. जे मला वाटलं ते मनापासून लिहिलं. ते तुम्हालाही पटलंय. कारण ते तुमच्या मनातलं होतं. मी विचारवंत अथवा तत्त्वज्ञ अशा कोणत्याही श्रेष्ठ अमानवी कॅटेगरीतला नाही. ही महान मंडळी जे जगणं जाडजुड पुस्तकात शोधतात, ते मला प्रत्यक्ष व्यवहारात ढळढळीत दिसतं. कारण माझ्या नजरेचा पारा अजून शाबूत आहे… तो उडालेला नाही!
मी स्वतःशी शक्य तितका प्रामाणिक असणारा एक साधा लॉजिकल माणूस आहे बस्स! अशी बेसिक फिचर्स असणारी माणसं आजच्या काळात आऊटडेटेड आणि अल्पसंख्य ठरताहेत. कारण इथली अँड्रॉइड मंडळी आता झपाट्याने स्मार्ट होत चाललीत. त्यातली काही तर अकालीच ‘सेलिब्रिटी मोड’वर गेलीत. त्यामुळे ऐकावं कोणी असा प्रश्न असताना माझ्यासारख्या मायनॉरिटीतल्या माणसाचं ऐकून घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार !
-हेमराज बागुल