१२७ वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित होणार; भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावर देखील कोरोनाचं सावट आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच होणार आहे. इतकी वर्षे कोतवाल चावडीत भव्य मांडव उभारून गणपतीची परतिष्ठापना होत होती. ही १२७ वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सामाजिक भान जपत हा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी एखाद्या ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृती उभारून त्यात बाप्पा विराजमान व्हायचे. यावर्षी मात्र मांडव किंवा मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार नाही. अतिशय साध्या पद्धतीने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे.
यंदाचा उत्सव मंदिरात साजरा करत असताना भक्तांना बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणें मंदिरात प्रवेश न करता बाहेरून दर्शन घेता येणार आहे. उत्सवाचे आकर्षण असलेलं महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण, विद्यार्थ्यांचं अथर्वशीर्ष पठण यांसह इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंदिरात उत्सव साजरा करत असताना आरोग्य विषयक जनजागृती तसेच आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.