पुणे: राज्यातील कोकण आणि मध्यमहाराष्ट्राच्या (घाटमाथा) काही भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, औरंगाबाद शहर व परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सोमवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस मंगळवारी रात्रीही सुरू होता.
राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, कोकण आणि मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात (घाटमाथा) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार तर मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.
भीजपाऊस पिकांसाठी हानीकारक:
औरंगाबाद जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येस भीजपाऊस झाल्यामुळे चैतन्यदायाी वातावरण निर्माण झाले आहे. जायकवाडीसह छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढत असून, खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेने रात्रीच्या पावसाची नोंद ३१.६ मिमी एवढी केली आहे. सध्या सर्वच नक्षत्रात पाऊस पडत आहे. जायकवाडी धरणात ५४ टक्के पाणीसाठा झाला आहे. सृष्टीने हिरवा शालू परिधान केल्यागत वातावरण आहे. शेत-शिवारात जोमदार पिके डोलत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात ‘नभ मेघांनी आक्रमिले…’ असे वातावरण आहे. मंगळवारी तर दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सध्या आश्लेषा नक्षत्र सुरू असून, सर्वच नक्षत्रात एकसारखा सुरू असलेला पाऊस खरीप पिकांसाठी हानीकारक ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, मका आदी पिकांना धोका निर्माण झाला असल्याचे कृषीतज्ज्ञ डॉ. विश्वासराव पालीमकर यांनी सांगितले.