मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये त्यामुळे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रधानमंत्र्यांकडे केली.
विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन (ॲग्रीगेट) उत्तीर्ण करण्यात यावे. कोरानामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार, यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कोरोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध असल्याचे सांगतानाच या सुविधांसाठी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मास्क, सोशल डिस्टंन्सिंग सध्या हे औषध: कोरोनावर अद्याप औषध नाही आणि लस अजून उपलब्ध झालेली नाही. जनजागृती करतांना आज घडीला तरी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग हेच औषध आणि लस आहे असे नागरिकांना समजून सांगतले आणि अशा पद्धतीने कोरोनासोबत आपण जगायला शिकलो तर लॉकडाऊन नाही तर अनलॉकिंगची प्रक्रिया आणखी सोपी व जलद होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडले.