पुणे: राज्यातील मध्यमहाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण वाढले असून, पुढील तीन ते चार दिवस मध्यमहाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातील घाटमाथ्यावर तसेच मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात मुसळधार तर नंदुरबार आणि धुळे या भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर सर्वच भागात चांगला पाऊस झाला.
राज्यातील मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथा आणि कोकणात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सध्या या भागात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या परिसरातील सखल भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तसेच काही भागात केवळ ढगाळ वातावरण दिवसभर आहे. याबरोबरच मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागातील मुसळधार पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील तीन ते चार दिवस तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरापासून ओडिशापर्यंत आणि पुढे उत्तर आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती आहे. यामुळे पाऊस वाढू लागला आहे.