# संपत्ती दानापेक्षाही अवयवदानाचे महत्त्व -डॉ.रवींद्र वानखेडे.

औरंगाबाद: संपत्ती दान यापेक्षाही देहदान मोलाचे असून हे दान केले तर अनेकांचे प्राण वाचतील. अवयवदान करणाऱ्या दात्यांसाठी मरणानंतर ही जीवन जगत असते, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक अवयवदान दिनी कार्यक्रम आयोजित करण्याबाबतची सूचना कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व विद्यापीठांना केली होती. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागपूर येथील कार्यकर्ते डॉ. रवी वानखेडे (संचालक, जीवन ज्योती ब्लड बँक) पुरुषोत्तम पवार (समन्वयक, ऑर्गन डोनेशन, वसई) यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. वानखेडे म्हणाले, कोणत्याही स्वरूपाचे दान असो ते गरजू व्यक्तिंना केले तर त्याला अधिक महत्व प्राप्त होते. आपल्याकडील संपत्ती ही गरजूंना दान केल्यास ईश्वरभाव प्राप्त होतो, असे म्हणतात. त्याअनुषंगाने नाशवंत मानवी शरीर मातीत विलीन करण्यापेक्षा आपली देहरूपी संपत्ती मरणोत्तर दान केली तर अनेकांचे प्राण वाचविल्याचे पुण्य प्राप्त होईल, असेही डॉ. वानखेडे म्हणाले.

यावेळी पुरुषोत्तम पवार पाटील म्हणाले, अवयवदान व देहदान या दोन्हीमध्ये फरक आहे. अवयवदान हे जिवंतपणी व मरणानंतर ही करता येते. मृत्यूपश्चात करण्यात येणाऱ्या अवयवदानानंतर मृत शरीर हे नातेवाईकांच्या ताब्यात देताना ते व्यवस्थित प्रक्रिया करून दिले जाते. ज्यामुळे एखादा अवयव काढून घेतल्याच्या कोणत्याही खुणा दर्शनी भागावर दिसून येत नाहीत. त्यामुळे अवयवदान केल्यानंतर धार्मिक विधी करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. अवयवदान करताना शरीरातील ठराविक अवयवच दान केले जातात. परंतौ देहदान हे फक्त मरणानंतरच एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना मानवी शरीराच्या अभ्यास, प्रात्यक्षिक व संशोधन करण्यासाठी दिले जाते. देहादानानंतर असे मृत शरीर धार्मिक विधी करण्यासाठी नातेवाईंकांकडे दिले जात नाही तर ते फक्त संशोधनासाठीच वापरले जाते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अवयवदानाचा संकल्प करून आदर्श निर्माण केला आहे, असेही पुरुषोत्तम पवार म्हणाले.

कुलगुरूंचा अवयवदानाचा संकल्प:

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, मी अवयवदानाचा संकल्प केला आहे. प्रभात कार्य करणाऱ्या मोहन फाउंडेशन (चेन्नई ) या संस्थेला ऑनलाईन फॉर्म देखील त्यांनी भरुन पाठविला आहे. रक्तदान, नेत्रदान याप्रमाणेच अलीकडच्या काळात अवयवदान चळवळ मोठ्या प्रमाणात विकसीत झाली आहे, असेही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. प्र-कुलगुरू प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजिब खान आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ कैलास अंभुरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *