पुणे: मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथ्यासह कोकणातील सर्वच भागात 17 ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून याच भागासह उर्वरित भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा या भागासह घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.
बंगालच्या उपसागरातील उत्तर पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो सध्या उत्तर ओडिशा आणि उत्तर आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत कार्यरत आहे. याबरोबरोबरच याच भागात चक्रीय स्थिती असून, त्याचाही प्रभाव वाढला आहे.
पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रावरून वाहत आहेत. मान्सूनचा ट्रफ सर्वसाधारण स्थितीपेक्षा उत्तरेकडे सरकला आहे. या सर्वच स्थितीचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा या भागासह घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. याबरोबरच मध्यमहाराष्ट्रातील सखल भागात संततधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
गेल्या सुमारे चार ते पाच दिवसांपासून राज्यातील मध्यमहाराष्ट्रात (तेही दक्षिण मध्यमहाराष्ट्र) घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. असाच पाऊस कोकणात देखील पडत आहे. त्यामुळे नद्यांना पूर आले आहेत. या भागात येत असलेल्या धरणांमध्ये पाणीसाठा चांगलाच वाढू लागला आहे. याउलट मराठवाडा आणि विदर्भात जुलै महिन्यात असलेला पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला असून, केवळ काही भागात मध्यम तसेच मुसळधार पाऊस बरसत आहे. 17 ऑगस्टपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.