सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम; प्रा. नानासाहेब गाठाळ यांचाही सहभाग
पुणे: नवीन येवू घातलेल्या शैक्षणिक धोरणाच्या प्रारुपात, प्रचलित काळातील प्राप्त परिस्थितीत कोणत्या मार्गाने शिक्षण दिले जावे याचा विचार करण्याची, त्यात म्हणले जाते आहे त्याप्रमाणे आमूलाग्र बदल करण्याची अपरिहार्यता काय आहे, नेमके हे बदलते धोरण व त्याचे प्रारूप काय आहे, त्यातून काय साध्य करायचे आहे व होणार आहे, त्यात कुठल्या बाबींवर काळजीपूर्वक चर्चा व मंथन होणे आवश्यक आहे – अथवा नाही, विविध स्तरावरची समता-विषमता याबाबतीत नवे प्रारूप कोणता दृष्टीकोन ठेवते आहे, शैक्षणिक धोरणातील प्रस्तावित बदलाच्या प्रेरणा काय आहेत, शिक्षण राबवण्याच्या कोणत्या पद्धती प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, त्यातली आव्हाने व संधी तसेच आक्षेप काय आहेत. या सर्वांची चर्चा करणे क्रमप्राप्त आहे.
पालक आणि शिक्षक यांच्या जिव्हाळ्याच्या व भविष्याचा वेध घेवू पाहणाऱ्या या महत्वाच्या विषयावर तज्ज्ञांचे, अभ्यासकांचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. या हेतूने, ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत अनुषंगिक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान (पानगाव ता.रेणापूर जि.लातूर) या संस्थेतर्फे नजिकच्या येत्या काळात निरंतर मंथन आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून पहिल्या आभासी परिसंवादाचे आयोजन शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता ‘झूम’द्वारे करण्यात येत आहे.
शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक व साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांचे मार्गदर्शन परिसंवादास लाभणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रा. नानासाहेब गाठाळ हे राहणार आहेत. सर्व पालक, शिक्षक, अभ्यासक व सुजाण नागरिकांसाठी ते मोफत असणार आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा व सहभागी व्हावे असे प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुरेंद्र कुलकर्णी 9767202265 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच सहभागी होण्यासाठी आवश्यक माहिती खाली देण्यात आली असून ती प्रतिष्ठानच्या https://www.skspratishthan.com
या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.