नवी दिल्ली: भारतातील फेस बुक आणि व्हाटस् अप हे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चालवत असल्याचा आरोप ट्वीटद्वारे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, भाजप आणि संघ फेक न्यूज आणि द्वेष पसरवण्यासाठी याचा वापर करत आहेत. अमेरिकेन मीडियाने हे सत्य उघड केले आहे.
यासंदर्भात अमेरिकेतील वाॅल स्ट्रीट जर्नलने वृत्त प्रकाशित केले आहे. फेसबुक सध्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर राजकीय आणि ‘हेट स्पीच’ बाबत काटेकोर लक्ष ठेवत असल्याचं दिसत आहे, असं असतानाही भाजपच्या पोस्टकडे कानाडोळा करत असल्याचा रिपोर्ट वॉल स्ट्रिट जर्नलने दिला आहे. त्यात म्हटलं आहे की, रोहिंग्या मुस्लिमांना ठार मारावं अशी पोस्ट करणाऱ्या भाजपच्या टी राजा सिंग (T Raja Singh) यांचे अकाउंट अजूनही फेसबुकवर आहे. जगभरातील फेसबुकच्या माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांनी अशा पोस्ट आणि खातं डिलिट करायला हवं असं म्हटलं आहे. अमेरिकेतील रेडिओ होस्ट ऍलेक्स जोन्स, नेशन ऑफ इस्लामचे नेते लुईस फर्राखन आणि इतर कट्टरपंथी संघटनांच्या फेस बुक अकाउंटवर कारवाई केल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. टी राजा सिंग हे भाजपचे नेते असून अद्यापही ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रीय दिसतात. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. फेस बुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी एक्झिक्युटीव अन्खी दास यांनी टी राजा सिंग आणि किमान तीन इतर हिंदुत्ववाद्यांच्या पोस्टविरोधात हेट स्पीच रूल लागू करण्यास विरोध केला असंही फेस बुकच्या जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. अन्खी दास यांच्या कामाचा एक भाग चक्क फेसबुकच्या वतीने भारत सरकारचा उदो उदो करणं असल्याचाही दावा काही कर्मचाऱ्यांनी केला. त्यांनी असंही म्हटलं की, जर मोदींच्या पक्षातील कोणी नियमांचे उल्लंघन केलं आणि त्यांच्याविरोधात कारवाई केली तर कंपनीला देशात मोठं नुकसान सहन करावं लागेल. फेस बुकला सर्वाधिक युजर भारतातून मिळतात असंही दास यांनी बजावल्याचं कर्मचारी सांगतात. फेस बुकसमोर मुख्य समास्या आहे ती म्हणजे पॉलिसी org ही प्लॅटफॉर्मचे नियम आणि सरकारला खूश करणे या दोन्हीसाठी जबाबदार असते असं फेस बुकचे माजी मुख्य सुरक्षा अधिकारी अॅलेक्स स्टॅमोस यांनी मे महिन्यात एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकेसंदर्भात लिहिलेल्या एका आर्टिकलचा त्यांनी उल्लेख केला होता. त्यांच्या म्हणण्याला फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्यांनी दुजोरा दिला होता.
अमेरिकेत फेस बुक आरोपीच्या पिंजऱ्यात:
अमेरिकेत फेस बुक पॉलिसी कंटेन्टची मोठी अडचण झाली आहे. अनेकदा राजकीय पक्षपात केल्याचा आरोप फेस बुकवर झाला. काही बड्या कंपन्यांनी, जाहिरातदारांनी त्यांच्यावर बहिष्कारही टाकला. दरम्यान, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं होतं की, कंपनी त्यांचा प्लॅटफॉर्म कधीच हिंसा भडकावण्यासाठी किंवा लोकशाहीच्या प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी वापरू देणार नाही. असं कृत्य सहन केलं जाणार नाही. दुसरीकडे मे महिन्यात ट्रम्प यांच्यावरून प्रश्न विचारल्यावर झुकरबर्ग यांनी म्हटलं होतं की, लोकांना समजलं पाहिजे की राजकारणी काय म्हणत आहेत. मात्र, यातील काही गोष्टींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.