नवी दिल्ली: जेईई मेन आणि नीट 2020 या परीक्षा वेळेतच होतील, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज सोमवारी दिला. जेईई व नीट या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या खंडपीठाने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत परीक्षा वेळेतच होतील, असा निर्णय दिला. त्यामुळे जेईई मेन ही परीक्षा 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान व नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी परीक्षा झाली पाहिजे, यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे सुनावणीदरम्यान सांगितले. त्यामुळे आता परीक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.