पुणे: कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून नाविन्याचा ध्यास घेताना उपयुक्ततेला प्राधान्य द्यावे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्सच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स व पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित ऑनलाईन वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्समध्ये तीस पत्रकारांनी प्रशिक्षण पूर्ण केले. तसेच यावेळी प्रशिक्षणातील एका विद्यार्थ्याने स्वतः तयार केलेल्या वेबसाइटचेही उद्घाटन करण्यात आले, तर या प्रशिक्षणात ज्या विद्यार्थ्यानी उत्कृष्ट कामगिरी करीत स्वतः वेबसाईट तयार करण्याचा प्रयत्न केला अशा पाच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला ‘यशस्वी’ संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, पत्रकार संघाचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, ‘यशस्वी’ संस्थेच्या प्रशिक्षिका वैशाली भुसारे यांच्यासह कोर्समध्ये सहभागी झालेले काही पत्रकार अशा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत हा कार्यक्रम झाला.