बदल्या होऊन 11 दिवस उलटले तरी अर्थपूर्ण व्यवहारासाठी बदल्यांना तोंडी आदेशाने स्थगिती
पुणे: विभागातील नायब तहसीलदारांच्या बदल्यांच्या घोळ अद्याप थांबलेला नाही. विभागीय आयुक्तांनी 31 नायब तहसीलदारांच्या नियतकालिक बदल्यांचे आदेश विभागातील पाचही जिल्ह्यांत पाठवले खरे. मात्र, बदल्यांचा घोडेबाजार तेजीत असल्यामुळे या बदल्यांना तोंडी आदेशाने स्थगिती दिल्याने बदली झालेले नायब तहसीलदार सध्या अस्वस्थ झाले आहेत.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बदली नियमाच्या अनुषंगाने व समुपदेशनाद्वारे आपल्या स्तरावर 31 नायब तहसीलदारांचे बदलीचे आदेश 10 ऑगस्ट रोजी जारी केले. हे आदेश पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात पाठवण्यात आले. मात्र, हे आदेश बजावण्याआधिच तोंडी आदेशाद्वारे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. याला कारणही तसेच आहे. मुदतपूर्व व विनंती बदल्यांमुळे हे घोडे अडले आहे. मुदतपूर्व व विनंती बदल्या या राज्यमंत्री स्तरावरून होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो. या बदल्यांमुळे नियतकालिक बदल्यांवर गंडांतर आल्याने त्यांच्या बदल्या होऊनही आज 11 दिवस झाले तरी बदल्यांचा घोळ अद्याप संपलेला नाही.
बदल्या करतांनाही नियमानुसार व 15 टक्के बदल्यांध्ये 31 जणांच्या बदल्या अपेक्षित असताना केवळ 17 जणांच्याच बदल्या केल्या आहेत. यामध्ये 12 जणांच्या बदल्या राज्यमंत्री स्तरावरून होणार असल्याने नियतकालिक बदल्यांमधील 12 जणांमुळे बदल्यांवर गंडांतर आले आहे. आता या 12 जणांमध्ये नियतकालिक बदल्यांमधीलच नायब तहसीलदारांच्याच बदल्या करणे अपेक्षित असताना यामध्ये मुदतपूर्व व विनंतीवाले क्रीम पोस्टवर डोळा ठेवून असल्यामुळे या बदल्यांचे घोडे अडले आहे. आज 11 दिवस झाले तरी मंत्री स्तरावरूनही यामध्ये समाधानकारक व्यवहार न झाल्यामुळे बदल्यांचे हे घोडे अडले आहे.